पाकिस्तानी क्रिकेटला नवसंजीवनी की हादरा?, जय शहा आयसीसी अध्यक्ष झाल्यामुळे पीसीबी संभ्रमात

हिंदुस्थान आणि पाकिस्तानात जेव्हाही क्रिकेट खेळण्याचा विषय समोर येतो तेव्हा वादाची ठिणगी पडतेच. त्यामुळे उभय देशांत क्रिकेटची मालिका आयोजित होणेच बंद पडले आहे. आता पुन्हा एकदा सर्वांसमोर प्रश्न उभा ठाकलाय की आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात खेळणार की नाही? आता आयसीसीचे अध्यक्ष पद जय शहा यांच्याकडेच आल्यामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) हृदयाचे ठोके दुप्पट वेगाने वाढलेत. जय शहा आपल्या अध्यक्ष पदाखाली पाकिस्तानी क्रिकेटला नवसंजीवनी देणार की हादरा देणार, याबाबत जागतिक क्रिकेटमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या वर्षी आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या पाकिस्तानी सहभागाबाबतही शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम होती. पण आयसीसीच्या दबावामुळे ते हिंदुस्थानात येऊन खेळले, पण त्याआधी पाकिस्तानात झालेल्या आशिया कपमध्ये हिंदुस्थान हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंकेत खेळला होता. ही गोष्ट पाकिस्तानला खटकली होती. पण आयसीसीला हिंदुस्थानातूनच आर्थिक रसद मिळत असल्यामुळे पाकिस्तानला झुकावे लागले होते. आता पुढच्या वर्षी पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाची संधी मिळाली आहे.

या स्पर्धेमुळे पाकिस्तानी क्रिकेटला नवसंजीवनी देण्यासाठी पीसीबी कामाला लागली आहे. यासाठी हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात यावा म्हणून त्यांनी आतापासून अल्लाकडे दुआ केली आहे. तसेच आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनाही अर्ज केलाय. पण तो अर्ज बार्कले मंजूर करणार की नाही याबाबत साशंकता आहे. परिणामता चॅम्पियन्स ट्रॉफीतील हिंदुस्थानी संघाच्या सहभागाचा निर्णय केंद्र सरकारलाच घ्यावा लागणार आहे. बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शहा यांचा पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळण्यास विरोध होता. मात्र आता आयसीसी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना क्रिकेटच्या भल्यासाठी काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यांनी अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे म्हटलेय. त्यामुळे त्यांना आयसीसी अध्यक्षाच्या कोटात पाकिस्तानी क्रिकेटच्या भल्याचा विचार करावा लागणार आहे. सध्या पाकिस्तानमधील क्रिकेट व्यवस्था ढासळत चाललीय.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यशस्वी आयोजन त्यांच्या क्रिकेटला नवसंजीवनी देणारे ठरणार असल्याचा सर्वांनाच अंदाज आहे. पण त्यांच्या स्पर्धेचे यश हे पूर्णतः हिंदुस्थानच्या खेळण्यावरच अवलंबून आहे. बीसीसीआय सचिव म्हणून जय शहा यांचे पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेटला विरोध करणे सर्वांना पटत होते, पण आयसीसीचे अध्यक्ष म्हणून त्यांना आता सर्वसमावेशक आणि क्रिकेटच्या हिताचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे ते हिंदुस्थानला पाकिस्तान खेळविण्यासाठी केंद्र सरकारला राजी करून आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत एक दुर्मिळ स्पर्धा आयोजनाची गोष्ट साकारतील, असा अंदाज क्रिकेट जाणकार वर्तवत आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत जय शहा यांची भूमिका लवकरच सर्वांसमोर येईल.

येत्या फेब्रुवारीमार्चमध्ये स्पर्धा

पाकिस्तानात येत्या 19 फेब्रुवारी ते 9 मार्चदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडी या शहरांत खेळविले जाणार आहेत. 8 संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत एकूण 15 सामने होणार आहेत. या स्पर्धेतील हिंदुस्थानचे सामने सुरक्षेच्या कारणास्तव एकाच शहरात खेळविण्याचा विचार पीसीबी करत आहे. मात्र त्यासाठी ते हिंदुस्थानी संघाच्या होकाराची प्रतीक्षा करीत आहेत.