जगन्नाथ मंदिरात 1 जानेवारीपासून ड्रेसकोड लागू; स्लीव्हलेस, स्कर्ट्सना बंदी

ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेकडो भक्तांनी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतलं. दरम्यान, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सभ्य आणि संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घालणं अनिवार्य असेल. हाफ पँट, चड्डी, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी गुटखा आणि पानावर बंदी लागू करण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडही आकारण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.