चंद्राबाबू सराईत खोटारडे, त्यांना समज द्या! लाडू प्रकरणावरून जगनमोहन रेड्डींचे पंतप्रधानांना पत्र

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे सराईत खोटारडे असून केवळ राजकीय स्वार्थासाठी ते कोटय़वधी भक्तांच्या भावना दुखावत आहेत, असा आरोप तिरुपती देवस्थानच्या लाडूंविषयी निर्माण झालेल्या वादंगाच्या केंद्रस्थानी असलेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी केला आहे. या निर्लज्ज खोटेपणाबद्दल चंद्राबाबू यांना कठोर शब्दांत समज देण्याची गरज आहे. सर्व देश यासाठी पंतप्रधानांकडे बघत आहे, असे रेड्डी यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

चंद्राबाबू यांच्या बेदरकार वक्तव्यांमुळे तिरुमला तिरुपती देवस्थान बोर्डाचे पावित्र्यही कलंकित झाले आहे. कोटय़वधी हिंदू भक्तांच्या मनातील संशयाचे निराकरण करण्यासाठी सत्य काय ते उजेडात आणले जावे, अशी मागणी रेड्डी यांनी केली.

तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूच्या प्रसादात प्राणीजन्य चरबीचा वापर केल्याचा आरोप चंद्राबाबू यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी चंद्राबाबू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी जगनमोहन रेड्डी यांना लक्ष्य केले आहे. वादंगानंतर आता पुन्हा नंदिनीचे तूप प्रसादाचे लाडू वळण्यासाठी खरेदी करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा उपवास

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आजपासून 11 दिवसांचा प्रायश्चित उपवास सुरू केला आहे. भेसळीबद्दल मला आधी कळले नाही याचे मला वाईट वाटते आहे. म्हणून मी हा उपवास करत आहे, असे ते म्हणाले.

चंद्राबाबू यांनी केली एसआयटी चौकशीची घोषणा

या प्रकरणी चौकशीसाठी आपण एसआयटी स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. आयजी स्तरावर किंवा त्याहून वरच्या अधिकाऱ्यांसह एक एसआयटी स्थापन केली जाईल. ती सर्व कारणे, अधिकाराचा दुरुपयोग तपासेल आणि सरकारला अहवाल देईल. तसेच, सोमवारी तिरुमला येथे शुद्धीकरणासाठी संथी होमम पंचगव्य प्रोक्षण विधीचे आयोजन केले जाईल, असे ते म्हणाले.

काय म्हणाले जगनमोहन….

भगवान व्यंकटेश्वराचे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात कोटय़वधी हिंदू भक्त आहेत. ही नाजूक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही तर या खोटय़ा गोष्टींमुळे व्यापक वेदना निर्माण होऊ शकतात. विविध आघाडय़ांवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी भीतीही जगनमोहन रेड्डी यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली.