कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ राहावे मात्र नेत्यांनी निष्ठा विकावी, असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. पक्ष फोडून तयार झालेल्या महायुतीच्या नेत्यांनी एकनिष्ठतेचे धडे देणे योग्य नाही. केवळ सत्तेसाठी एकमेकांच्या जागेवर आपापले उमेदवार देणे जनतेने सहन करू नये, असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
नेवासा येथे भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे घेतलेल्या निर्धार मेळाव्यात बोलताना बच्चू कडू म्हणाले, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना सर्व अनुकूल असताना आणि त्यांनी एकनिष्ठपणे काम करूनही पक्षाने त्यांचा घात केला. तरीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, तालुक्यात भाजप वाढलेला असताना, वरिष्ठ पातळीवरून षडयंत्र रचून हा मतदारसंघ भाजपाऐवजी मिंधेसेनेला गेला. त्यास पडद्यामागून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ असल्याचा आरोप त्यांनी केला. जे महायुतीचे उमेदवार आहेत, ते कारखान्याचे संचालक असल्याने कारखानदारांच्या विरोधात जाऊन न्याय देतील का? त्यामुळे आपण बंडाचा झेंडा फडकावत असून, बॅट हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत मिंधे सेनेच्या उमेदवाराला मताधिक्य देणे ही चूक झाली. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपऐवजी शिंदे गटाला गेल्याने भाजपाचे तालुक्यातील अस्तित्व संपले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, मिंधे सेनेचे शहरप्रमुख बाबा कांगुणे आदींनी मनोगत व्यक्त केले.