महायुतीमध्ये भाजपला काय मिळते याला काही महत्त्व नाही; जागावाटपाबाबत बावनकुळे यांचे मत

राज्यामध्ये आमची महायुती आहे. भाजपला काय मिळते याला काही महत्त्व नाही. आम्ही घटक पक्षांना बरोबर घेऊन निर्णय घेणार असल्याचे सुतोवाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही, म्हणून आता सरकार काळजी घेऊन आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. नगर शहरामध्ये भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे, भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर यासह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, राज्यामध्ये आमची महायुती आहे. आम्ही अकरा पक्ष या ठिकाणी आहोत. भाजपाला काय मिळेल काय नाही यामध्ये आम्ही पडणार नाही. आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये लोकसभेला भाजपचे राज्यामध्ये 45 खासदार दिसतील, असा दावा बावनकुळे यांनी केला. देशामध्ये पुन्हा मोदी सरकार येईल असेही ते म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. त्याला सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जनता त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेते. मात्र त्यांचे आरक्षण देताना ते न्यायालयात टिकले नाही म्हणून आता या सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे. म्हणून सरकार आता त्या पद्धतीने वाटचाल करत आहे. आगामी काळामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल कोणाचेही दुमत नाही, पण या सर्व बाबींच्यासाठी आता सरकार गांभीर्याने विचार करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाचा प्रश्न हा अनेक वर्षांपासूनचा आहे. त्यांनी आता आठ ते दहा हजार कोटी रुपयांच्या सवलतींच्या संदर्भात मागणी केली आहे. त्या सर्वचा सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशामध्ये नरेंद्र मोदी हे गोरगरिबांसाठी काम करत आहे. 2047 सालापर्यंत काँग्रेसचे सरकार या देशांमध्ये येणार नाही याची धास्ती राहुल गांधी यांनी घेतली आहे. त्यामुळेच ते जनतेला गोंधळात टाकत आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.