एअर स्ट्राईकमध्ये हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला ठार, इस्रायलच्या सैन्याचा दावा

इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस चिघळत आहे. लेबनॉनमध्ये पेजर, सौर उपकरणांचे स्फोट झाल्यानंतर हिजबुल्ला आणखी आक्रमक झाली आणि इस्रायलच्या विविध भागांवर हल्ले सुरू केले. यानंतर शुक्रवारी हिजबुल्लाचे बेरूतमधील मुख्यालय इस्रायलने अचूक हवाई हल्ला करत जमीनदोस्त केले. या हल्ल्यात 2 ठार आणि 76 जण जखमी झाले आहेत. तर ठार झालेल्यांपैकी एक हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला असल्याचा मोठा दावा शनिवारी इस्रायलने केला आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सने आपल्या अधिकृत X हँडलवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. ‘हसन नसरल्ला यापुढे जगात दहशत माजवू शकणार नाही. आम्ही दहशतवादी संघटना हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्ला आणि दक्षिण आघाडीचा कमांडर अली कराकी या दोघांनाही ठार केले आहे, असा दावा इस्रायलने पोस्टमधून केला आहे. दरम्यान, इस्त्रायलने दक्षिण बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात नसरल्ला आणि त्याची मुलगी झैनाब ठार झाल्याचे बोलले जात आहे.

आयडीएफचे प्रवक्ते (Israel Defense Forces) डॅनियल हगारी यांनी याबाबत भाष्य केलं. ‘इस्रायली गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या अचूक माहितीनंतर, आमच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी दहियाह भागातील एका निवासी इमारतीच्या तळघरात असलेली दहशतवादी संघटना हिजबुल्लाच्या मध्यवर्ती मुख्यालयावर हल्ला केला. इस्त्रायली नागरिकांविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्याच्या रणनीतीवर हिजबुल्लाचे वरिष्ठ नेतृत्व मुख्यालयात काम करत असताना हा हल्ला करण्यात आला आहे, असे डॅनियल हगारी यांनी सांगितले.