Israel Palestine Conflict – तीन महिन्यांपूर्वी हमासच्या तीन प्रमुख नेत्यांना संपवलं, इस्त्रायलचा मोठा दावा

इस्त्रायलने हमासच्या तीन प्रमुख नेत्यांचा खात्मा केल्याचा मोठा दावा केला आहे. तीन महिन्यांपूर्वी गाझामध्ये झालेल्या हल्ल्यात हमासच्या तीन वरिष्ठ नेत्यांचा खात्मा केल्याचे इस्त्रायलच्या संरक्षण दलाने गुरुवारी सांगितले. यामध्ये हमास सरकारचा प्रमुख रावी मुश्ताहा याचाही समावेश आहे. मुश्ताहा हा हमास प्रमुख याह्या सिनवारचा प्रमुख मानला जात आहे.

इस्त्रायल सैन्याकडून गाझामध्ये हमासच्या विरोधात वर्षभरापासून कारवाई सुरू आहे. आता इस्त्रायल डिफेंस फोर्सेसने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट करत मोठी माहिती दिली आहे. गाझापट्टीमध्ये हमासचा प्रमुख रावी मुश्ताहा आणि हमासच्या राजकीय ब्युरोच्या सुरक्षा विभागाचा प्रमुख समेह अल-सिराज आणि कमांडर सामी ओदेह ठार झाले आहेत.

इस्त्रायल सैन्याने निवेदन जारी केले आहे. मुश्ताहा हा हमासच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता आणि हमासच्या समर्थकांवर त्याचा प्रभाव होता. तसेच इस्त्रायली हवाई दलाला दहशतवादी गाझामधील एका बंकरमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर हल्ला केला. हा बंकर हमास कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर म्हणून काम करत असे आणि  दहशतवादी त्यात दीर्घकाळ राहू शकत होते, असे इस्रायलने म्हटले आहे.

यासोबतच “इस्त्रायल डिफेंस फोर्सेस 7 ऑक्टोबरच्या हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा पाठलाग सुरू ठेवेल आणि जो कोणी इस्रायलला धमकी देईल त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल”, इस्रायली सैन्याने म्हटले आहे.