इस्रायलच्या हल्ल्यात 356 लेबनीज ठार; 700 हून अधिक जखमी

पेजर आणि सौर उपकरणांच्या स्फोटानंतर इस्रायल आणि लेबनॉनमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायलने आज पुन्हा लेबनॉनमध्ये तब्बल 300 ठिकाणी क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात 356 जणांचा मृत्यू झाला, तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत, अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. इस्रायल डीफेन्स फोर्सच्या प्रवक्त्यानेही हल्ल्याला दुजोरा दिला असून लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहने ज्या इमारतीत रॉकेट्स आणि शस्त्र लपवून ठेवली आहेत त्या इमारतींच्या आसपास राहणाऱया लोकांना तत्काळ घरे रिकामी करण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून इस्रायलकडून लेबनॉनवर सातत्याने हवाई हल्ले होत आहेत. गेल्या आठवडय़ात गुरुवारी हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना इस्रायलने दक्षिण लेबनॉनवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले केले आहेत. दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहशी संबंधित ठिकाणांवर हल्ले करण्यात येत असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. त्याचबरोबर यापुढेही सातत्याने हल्ले करणार असेही इस्रायलने म्हटले आहे.

निरपराधांना मारणे हा घोर अपराध – लेबनॉन पंतप्रधान

लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी इस्रायलच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. लेबनॉनमधील गावे, चौक नष्ट करण्याचे इस्रायलचे ध्येय असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच इस्रायलचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मिकाती यांनी संयुक्त राष्ट्रांना केले आहे. अशाप्रकारे निरपराध लोकांना ठार मारणे हा घोर अपराध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नागरिकांना टेक्स्ट संदेश

इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील नागरिकांना हिजबुल्लाहच्या ठिकाणांपासून दूर जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. सोमवारी लेबनॉनची राजधानी बैरूत आणि देशातील अन्य क्षेत्रांतील नागरिकांना टेक्स्ट संदेश आणि रेकॉर्ड करण्यात आलेले संदेश पाठवण्यात आले होते. त्यात नागरिकांना तत्काळ घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले होते, असे वृत्त इस्रायली प्रसारमाध्यमांमधून चालवण्यात येत होते.