बांगलादेशमध्ये इस्कॉन ग्रुपच्या प्रमुखांपैकी एक असलेले चिन्मय दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिटगाव जिल्ह्यामध्ये बुधवारी संध्याकाळी चिन्मय दास ब्रम्हचारी यांच्यासह 19 अन्य हिंदू संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
चिन्मय दास यांनी 25 ऑक्टोबर रोजी चिटगावमध्ये एक रॅली आयोजित केली होती. त्या दरम्यान बांगलादेशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. रॅलीत बांगलादेशच्या राष्ट्रध्वजावर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. चिन्मय दास ब्रम्ह्यचारी हे बांगलादेशात इस्कॉन ट्रस्टचे सचिव आहेत आणि हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी सातत्याने रॅली आणि आंदोलनांचे आयोजन करत होते.
बांगलादेश सरकारने चिन्मय दास यांच्या विरोधात देशद्रोह आणि कटाचा आरोप लावून गुन्हा दाखल केला आहे. चिन्मय दासने सांगितले की, रॅलीच्या दिवशी काही लोकांनी चंद्र-ताऱ्याच्या ध्वजावर भगवा झेंडा फडकवला होता. चंद्र, तारे असलेला झेंडा बांगलादेशाचा राष्ट्रध्वज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. झेंडा फडकवणारे कोण होते, हे मला माहीत नाही. पण जर कोणी असामाजिक घटक असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अवामी लीगचे समर्थक आणि हिंदुस्थानच्या गुप्तचर संस्थेच्या (रॉ) सहकार्याने बांगलादेश विरोधात काम करत असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बांगलादेशातील सत्तापालटानंतर तेथील हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. तेथील हिंदूंवर विविध प्रकारचे हल्ले होत आहेत.