मुंबईच्या डावाला अजिंक्यची साथ, 3 बाद 37 वरून पहिल्या दिवशी मुंबई 4 बाद 237

मुकेश कुमारच्या माऱ्यापुढे मुंबईची 3 बाद 37 अशी वाताहत झाली होती. पण त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या धीरोदात्त आणि संयमी खेळीने मुंबईचा डाव सावरला. तसेच श्रेयस अय्यर आणि सरफराज खानबरोबर 102 आणि 98 धावांच्या दोन खणखणीत भागीदाऱ्या रचत शेष हिंदुस्थानविरुद्ध सुरू झालेल्या इराणी करंडकाच्या लढतीत पहिल्या दिवशी 4 बाद 237 अशी दमदार मजल मारत मुंबईच्या डावाला मजबुती दिली.

मुकेश कुमारने हादरवले

इराणी करंडकात आजवर शेष हिंदुस्थानचेच अधिक वर्चस्व राहिले असले तरी मुंबई आज त्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी उतरला होता. ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्याचा निर्णय योग्य असल्याचे मुकेश कुमारने आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर दाखवून दिले. मैदानात उतरताच फटकेबाजीच्या मूडमध्ये असलेल्या पृथ्वी शॉने पुन्हा एकदा निराश केले. मग त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर यष्टिरक्षक हार्दिक तामोरेला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. तो शून्यावरच बाद झाला. एकाच षटकात दोन हादरे बसल्याने मुंबईची 2 बाद 6 अशी वाईट अवस्था होती. मग कर्णधार अजिंक्य रहाणेने आयुष म्हात्रेच्या साथीने मुंबईच्या पडझडीला रोखण्याचा प्रयत्न केला. पण फलकावर अवघ्या 37 धावा लागल्या होत्या आणि मुकेशने आयुषची विकेट काढली.

अजिंक्यची कर्णधार खेळी

मुंबईची फलंदाजी मजबूत असूनही मुकेश कुमारने 3 फलंदाज बाद करत शेष हिंदुस्थानला अपेक्षित सुरुवात करून दिली होती. एकामागोमाग एक असे तीन धक्क्यांनी मुंबईची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळतेय की काय, असे चित्र उभे राहिले होते. तेव्हा अजिंक्य संकटमोचकासारखा धावून आला आणि त्याने श्रेयस अय्यरच्या मदतीने संघाला संकटातून बाहेर काढले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 102 धावांची दणदणीत आणि आक्रमक भागी रचली. श्रेयसने 6 चौकार आणि 2 षटकार खेचत 57 धावा ठोकल्या.  यश दयालने श्रेयसची खेळी संपवली. त्यानंतर रहाणेने सरफराज खानसह 98 धावांची आणखी एक दमदार भागी केली. हिंदुस्थानी संघात संधी न मिळालेल्या सरफराजने नाबाद 54 धावा करत मुंबईला द्विशतकापलीकडे नेले. पावसामुळे आजचा सामना काहीसा उशिरा सुरू झाला होता, पण अंधुक प्रकाशामुळे तासभर आधीच खेळ थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला. आधी ओले मैदान आणि त्यानंतर अंधुक प्रकाशामुळे 68 षटकांचाच खेळ झाला. खेळ थांबवला तेव्हा अजिंक्य (86) आपल्या 41 व्या प्रथम श्रेणी शतकापासून 14 धावा दूर होता, तर सरफराज खानला 15 व्या शतकाची संधी आहे.

आयुष म्हात्रे, मोहम्मद जुनेद खानचे पदार्पण

दोन दिवसांपूर्वीच मुशीर खानचा झालेल्या अपघातामुळे मुंबईने 17 वर्षीय आयुष म्हात्रेला प्रथम श्रेणी पदार्पणाची संधी दिली. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद जुनेद खानचेही भाग्य फळफळले असून तो शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थीसह मुंबईचा वेगवान मारा सांभाळेल. तसेच शेष हिंदुस्थान संघात यष्टिरक्षक ध्रुव जुरेल आणि यश दयालला संधी देण्यात आली. त्यामुळे इशान किशन यष्टीमागे नव्हे तर मैदानात क्षेत्ररक्षण करताना दिसेल.