इराणी ट्रॉफीवर सरफ’राज’, खणखणीत चौथे द्विशतक; मुंबईचा धावांचा डोंगर

कसोटी पदार्पणात दमदार फलंदाजी करूनही बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत आपल्या फलंदाजीची कमाल दाखवण्याची संधीच न मिळू शकलेल्या मुंबईकर सरफराज खानने आज संधीचे सोने करताना इराणी करंडकात विक्रमी द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला. त्याच्या 221 धावांच्या नाबाद खेळीमुळे शेष हिंदुस्थानविरुद्धच्या इराणी लढतीत मुंबईने दुसऱया दिवसअखेर 9 बाद 536 असा धावांचा डोंगर उभारला.

मंगळवारी 3 बाद 37 या बिकट अवस्थेतून कर्णधार अजिंक्य रहाणेने मुंबईला सावरले आणि मजबूत स्थितीत पोहोचवले. मंगळवारी श्रेयस अय्यरबरोबर 102 धावांची भागी रचल्यानंतर आज त्याने सरफराजबरोबर 131 धावांची भागी केली, पण दोन शतकी भागीदाऱया रचणाऱया अजिंक्यला आपले 41 वे प्रथम श्रेणी शतक ठोकता आले नाही. शतकापासून अवघ्या 3 धावा असताना यश दयालने त्याला यष्टीमागे जुरेलकडे झेल देण्यास भाग पाडले, मात्र सरफराजने झंझावाती खेळ करत कसोटीत अपेक्षित असलेली फलंदाजी इराणी करंडकात करून दाखवली. अजिंक्य बाद झाल्यावर शम्स मुलानीही लवकर बाद झाला. त्यानंतर तनुष कोटियनने सरफराजला अशी साथ दिली की, मुंबईने अनपेक्षितपणे 500 धावांच्या दिशेने झेप घेतली. सरफराजने शेष हिंदुस्थानच्या गोलंदाजीला अक्षरशः फोडून काढताना सातव्या विकेटसाठी 183 धावांची भागी रचली. 149 चेंडूंत शतकी टप्पा गाठणाऱया सरफराजने पुढील 121 धावा 127 चेंडूंत फटकावल्या. त्याने आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतील चौथे द्विशतक तीन षटकार आणि 23 चौकारांच्या मदतीने 253 चेंडूंत साकारले. तनुष कोटियनने 64 धावांची खेळी करत आपल्या धावांचा कोटा पूर्ण केला. दिवसअखेर तो 221 धावांवर नाबाद असून जुनेद खानच्या साथीने तो मुंबईच्या धावसंख्येत जितकी भर घालेल, तितकीच ती मुंबईच्या फायद्याची ठरणार आहे.

सरफराज पहिलाच मुंबईकर

इराणी करंडकाच्या इतिहासात आजवर 11 फलंदाजांनी द्विशतकी खेळी केल्या आहेत. इराणी करंडकात जास्त वेळा शेष हिंदुस्थानविरुद्ध भिडणारा संघ मुंबईचाच असायचा, पण आजवर मुंबई संघातल्या एकाही फलंदाजाला इराणी करंडकात द्विशतकी खेळी करता आली नव्हती. अखेर सरफराज खानने हा विक्रम केला. मात्र शेष हिंदुस्थानकडून खेळताना वसीम जाफर, प्रवीण अमरे, यशस्वी जैसवाल या मुंबईकरांनी द्विशतक ठोकले होते.