नवनीत कॉवत बीडचे नवे एसपी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली

संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे बीडसह राज्यभरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद विधीमंडळातही उमटले. परळीतील उद्योजकाचे अपहरण, बीडमधील गोळीबार, खंडणी अशा सर्वच घटना पाठोपाठ घडल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यानंतर दुसर्‍याच दिवशी संभाजीनगरचे उपायुक्त नवनीत कॉवत यांची बीडला एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉवत यांच्या नियुक्तीचे आदेश येताच त्यांना तातडीने पदभार घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री उशिरा कॉवत बीडमध्ये दाखल होवून पदभार घेणार आहेत.

पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हे वैद्यकीय रजेवर गेल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. शनिवारी सकाळी गृहखात्याने आदेश काढून संभाजीनगरचे उपायुक्त नवनीत कॉवत यांची बीडचे एसपी म्हणून नियुक्ती केली आहे. कॉवत हे त्याच दिवशी पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरा ते बीडमध्ये दाखल होवून पदभार स्वीकारणार आहेत.

कोण आहेत नवनित कॉवत?

नवनीत कॉवत हे मूळचे राजस्थानचे आहेत. ते 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कॉवत यांनी आयआयटीमधून बीटेकची पदवी घेतली आहे. त्यानंतर नोकरी करत त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली. 2017 मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. कॉवत हे सिंघम अधिकारी म्हणून ओळखले जातात.