Mumbai Indians चा ‘मास्टरस्ट्रोक’, Team India ला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खास सदस्याला दिली महत्त्वाची जबाबदारी

मुंबई इंडियन्सने IPL च्या 17 व्या हंगामात अत्यंत खराब प्रदर्शन केले होते. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा खेळ निराशाजनक होता. तसेच रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतल्यामुळे चाहत्यांच्या टीकेचा मुंबई इंडियन्सला सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी 18 व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने संघात महत्वपूर्ण बदल करायाल सुरुवात केली असून काही दिवसांपूर्वी महेला जयवर्धनेची मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. आता गोलंदाजी प्रशिक्षकाची निवड करण्यात आली असून टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आता MI च्या गोलंदाजांना गोलंदाजीचे धडे देताना दिसणार आहेत.

पारस म्हांबरे यांची मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याची घोषणा केली. लसीत मलिंगाच्या जोडीला पारस म्हांबरे सुद्धा गोलंदाजांना गोलंदाजीचे धडे देताना दिसणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सची गोलंदाजी अधिक धारधार होण्याची शक्यता आहे. पारस म्हांबरे टीम इंडियाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक राहिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करत विश्वचषक उंचावला होता. टीम इंडियाच्या विजयात प्रशिक्षक म्हणून पारस म्हांबरे यांचा खारीचा वाटा होता. ते टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.

पारस म्हांबरे यांनी टीम इंडियाकडून 2 कसोटी आणि 3 वन डे सामने खेळले आहेत. त्याचबरोबर प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर 284 विकेट आहेत. तसेच 105 डावांमध्ये 1665 धावा त्यांनी केल्या आहेत. पारस यांनी लिस्ट ए सामन्यात 83 सामने खेळले असून 111 विकेट घेतल्या आहेत.