IPL 2025 – KKR संघाला मिळाला गौतम गंभीरचा वारसदार, धोनीच्या हुकुमी एक्क्याकडे सोपवला कारभार

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर त्याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. त्यामुळे त्याला कोलकाता संघाला रामराम करावा लागला. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये कोलकाताचा संघ नवीन मेंटॉरच्या शोधात होता. हा शोध आता संपला असून महेंद्रसिंह धोनीसोबत चेन्नई सुपर किंग्जला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूची या पदासाठी निवड झाली आहे. याची घोषणा आज करण्यात आली.

गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने मेंटॉरपदी चेन्नईचा माजी गोलंदाज ड्वेन ब्रावो याची निवड केली आहे. गेल्यावर्षीच ब्रावोने आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो चेन्नईसोबत गोलंदाजी प्रशिक्षण म्हणून कार्यरत होता. आता त्याने कॅरेबियन प्रीमियर लीगसह क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. कालच त्याने याची घोषणा केली.

ब्रावो टी-20 क्रिकेटमधील यशस्वी गोलंदाज आहे. त्याने जगभरात टी-20 लीग खेळल्या आहेत. 582 लढतीत त्याच्या नावावर 631 विकेट्सची नोंद आहे. आयपीएलमध्येही त्याने 161 लढतीत 183 विकेट्स घेतल्या असून फलंदाजीत 1560 धावांचे योगदान दिले आहे. त्याने वेस्ट इंडिजकडून 40 कसोटी, 164 वन डे आणि 91 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 2 हजारांहून अधिक धावा आणि 86 विकेट्स आहेत. तर वन डे फॉरमॅटमध्ये त्याने 2900 हून अधिक धावा फटकावत 199 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20मध्येही त्याने अष्टपैलू खेळ दाखवत 1255 धावा आणि 78 विकेट्स घेतल्या आहेत.