आयपीएलच्या मेगा लिलाव प्रक्रियेची तारीख जाहीर झाली आणि चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगायला सुरुवात झाली. जगभरातील 1,574 खेळाडूंनी या लिलाव प्रक्रियेसाठी आपल्या नावाची नोंद केली आहे. यामध्ये इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्म अँडरसनच्या नावाचा सुद्धा समावेश आहे. मात्र, या लिलाव प्रक्रियेत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आपल्या नावाची नोंद केली नसल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बेन स्टोक्स आयपीएलच्या 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून मैदानात उतरला होता. मात्र दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. मात्र, IPL 2025 मध्ये बेन स्टोक्सचा दमदार खेळ पाहण्यासाठी चाहते आतूर होते. मात्र, त्याने लिलाव प्रक्रियेसाठी नाव नोंद न केल्याने चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बेन स्टोक्सच्या या निर्णयामुळे BCCI अॅक्शन मोडमध्ये आली आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार, परदेशी खेळाडूंना मेगा लिलावामध्ये आपल्या नावाची नोंद करणे अनिवार्य आहे. जर एखाद्या खेळाडूने नोंद केली नाही, तर तो खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या मिनि-लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळे बेन स्टोक्स आता 2026 मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये सुद्धा खेळताना दिसणार नाही.
बीसीसीआयने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार, जर एखाद्या खेळाडूला लिलाव प्रक्रियेमध्ये खरेदी करण्यात आले व त्यानंतर जर संबंधित खेळाडू काही कारणांनी स्पर्धेतून बाहेर पडला. तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित खेळाडूवर पुढील दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल. म्हणजेच तो खेळाडू पुढील दोन वर्ष आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही.