IPL 2024 – मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल

घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विजयाचा श्री गणेशा करेल असे सर्व चाहत्यांना वाटले होते. पण मुंबईची पराभवाची मालिका अजुनही संपलेली नाही. वानखेडेवर देखील चाहत्यांचा हिरमोड झाला. या सामन्यात राजस्थानने मुंबईचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयासाह राजस्थानचा संघ गुणतालिकेच पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला.

वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने घेतलेल्या निर्णयाचा मान ठेवत राजस्थानच्या गोलंदाजांनी धारधार मारा केला. रोहित शर्मा, नमन धीर आणि ब्रेविस यांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही. सलामीला आलेल्या इशानने 14 चेडूंमध्ये फक्त 16 धावा केल्या आणि तो सुद्धा स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पंड्याने (32) 6 चौकार तर तिलक वर्माने (34) 2 षटकारांच्या मदतीने संघाचा डाव सावरला आणि 125 धावा करत 126 धावांचे लक्ष राजस्थान समोर ठेवले. राजस्थानकडून चहल आणि बोल्टने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या, बर्गरने 2 आणि आवेश खानने 1 विकेट घेतली.

लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थाला पहिला धक्का अवघ्या 10 या धावसंख्येवर यशस्वी जयसवालच्या स्वरुपात बसला. जॉस बटलर (13), संजु सॅमसन (12), रविचंद्रन अश्विन (16) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. रियान परागने आक्रमक खेळ करत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा कुटल्या आणि राजस्थानला विजय मिळवून दिला. मुंबईकडून आकाश मधवाल याने सर्वाधिक 3 गडी बाद केले, तर क्वेना मफाकाला 1 विकेट मिळाली.