सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत खदखद; आमदार देशमुखांविरोधात मोर्चेबांधणी

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभा उमेदवारीसाठी भाजपात मोर्चेबांधणी सुरू झाली असून, विद्यमान आमदार विजय देशमुख यांच्याविरोधात पक्षातच खदखद असल्याने इच्छुकांनी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. माजी महापौर शोभा बनशेट्टी व माजी खासदारांचे स्वीय सहायक चिट्टे यांचे नाव पुढे आले आहे.

भाजपचे विजय देशमुख गेली चार टर्म शहर उत्तरचे आमदार आहेत. आता त्यांनी मुलगा किरण देशमुख यांच्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. आमदार विजय देशमुख यांनी मुलगा किरण याला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय सदस्य म्हणून घेण्यास शिफारस केली आहे. यामुळे भाजपातच अंतर्गत धुसफूस वाढली असून, त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीपूर्वीच उमटू लागले आहेत. आमदार विजय देशमुख यांनी शहरात व मतदारसंघामध्ये गेल्या दोन टर्ममध्ये आपले गट प्रबळ केले आहेत. त्यामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते दुखावले आहेत. त्यातच देशमुख हे मुलगा किरण याला विधानसभा निवडणुकीत पुढे आणण्याची तयारी करीत असल्यामुळे अंतर्गत संताप व्यक्त होत आहे.

सोलापूर शहरात भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपातील एक गट सक्रिय झाला आहे. माजी महापौर शोभा बनशेट्टी आणि भाजपातील जुने कार्यकर्ते आणि गेल्या दोन टर्मपासून भाजप खासदारांचे स्वीय सहायक असलेले चिट्टे यांनीही आमदारकीची तयारी सुरू केली आहे. शहर उत्तरमध्ये आमदार देशमुख यांना पक्षांतर्गत पर्याय शोधण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्न सुरू झाल्याने देशमुख हे सध्या भाजपाच्या प्रमुख कार्यक्रमांना दांडी मारताना दिसत आहेत. त्यामुळे शहर उत्तर भाजपामधील संघर्ष वाढला आहे. नुकतेच भाजपचे व्हीजेएनटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील केंद्रे यांनी माजी महापौर बनशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीचा तपशील अद्याप बाहेर आलेला नसला तरी शोभा बनशेट्टी यांच्या उमेदवारीबाबत साखरपेरणी झाल्याची चर्चा आहे.