भाजपमधील अंतर्गत वादाचा सायन कोळीवाड्यातील महायुतीला फटका; वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास कळीचा मुद्दा

सायन कोळीवाडा आणि प्रतीक्षानगरमधील नागरी समस्या सोडवण्यात राज्यातील सत्ताधाऱ्यांना सोडवण्यात आलेले अपयश, पालिका आणि पंजाबी कॉलनीचा रखडलेला पुनर्विकास आणि भाजपच्या दोन आमदारांमधील सुप्त संघर्ष याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रतीक्षानगरमध्ये रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांची जोरदार प्रचार सभा झाली. या सभेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सायन कोळीवाडा, प्रतीक्षानगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसैनिकांच्या मतांवर निवडणूक आलेल्या आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी या भागातील शिवसैनिक कट्टर आहेत. या शिवसैनिकांची शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावरील निष्ठा कायम आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे धाबे दणाणले आहे.

या भागातील भाजपच्या आमदाराच्या विरोधातही प्रचंड रोष आहे. गेल्या दहा वर्षांत विकासाची कामे केली नाहीत असा स्थानिकांचा आरोप आहे. भाजपचे आमदार तामीळ सेल्वन आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचे सांगण्यात येते. या भागातून विधानसभा लढवण्यास दोघेही इच्छुक आहेत. या दोघांमधील अंतर्गत संघर्षाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार असे सांगण्यात येते.

समस्यांचा डोंगर
या भागातील समस्यांचा डोंगर कायम आहे. पाण्याची समस्या सोडवण्यात भाजपच्या लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही. प्रतीक्षानगरमधील म्हाडाच्या इमारती आणि जमिनींना भेगा पडण्याची मोठी समस्या आहे. सत्ताधाऱ्यांना समस्या सोडवण्यात अपयश आल्याचा रोष स्थानिकांमध्ये आहे.

पालिका वसाहतीचा विकास रखडला
या भागातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरमध्ये पालिकेच्या मालकीच्या, पण भाडय़ाने दिलेल्या 32 इमारती आहेत. या इमारतींचा पुनर्विकास भाजपच्या हस्तक्षेपामुळे रखडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. कोरोनाकाळानंतर या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले, पण भाजपच्या हस्तक्षेपामुळे काम थांबले आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पालिका आयुक्तांवर दबाव टापून काम थांबवल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. पुनर्विकासाचे काम थांबल्याने रहिवासी नाराज आहेत. या नाराजीचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत.

पंजाबी कॉलनीतील मतदार विस्थापित
तशीच अवस्था पंजाबी कॉलनीची आहे. देशाच्या फाळणीनंतर उल्हासनगर, चेंबूरमध्ये पाकिस्तानातील विस्थापित जसे आले तसेच या भागातही आले तेव्हा केंद्र सरकारने या स्थलांतरित हिंदुस्थानी नागरिकांसाठी कॉलनी बांधली होती. अलीकडच्या काळात ही कॉलनी राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली. बीडीडी चाळींच्या धर्तीवर या चाळींचा म्हाडामार्फत पुनर्विकास करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी या इमारती पाडण्यात आल्या. या इमारतींमधील अडीच हजारांहून रहिवासी अन्यत्र स्थलांतरित झाले, पण इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागलेला नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये भाजपच्या विरोधात रोष आहे. हा रोष मतपेटीतून व्यक्त होण्याची शक्यता आहे.