भाजपमधील निष्ठावंतांच्या नाराजीचा स्फोट, शिस्तबद्ध पक्षात जाहीर लाथाळ्या सुरू; शक्तिप्रदर्शन आणि धुसफूस

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीवरून मिंधे गटात एकीकडे नाराजी असताना दुसरीकडे भाजपच्या पहिल्या यादीत स्थान न दिल्यामुळे या पक्षात नाराजीनाट्य, बंडखोरी, अंतर्गत लाथाळ्यांना सुरुवात झाली आहे. भाजपमधील सर्व नाराज उमेदवारांचा आणि इच्छुकांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर दोन दिवसांपासून महासागर उसळला आहे.

भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनंतर भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या विद्यमान आमदारांनी आणि इच्छुक उमेदवारांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर धाव घेतली आहे. दोन दिवसांपासून ‘सागर’ बंगल्यावर प्रचंड गर्दी उसळली आहे.

सागर बंगल्यावर बेशिस्तीचे दर्शन

भाजप म्हणजे केडरबेस आणि शिस्तप्रिय पक्ष असल्याचे कार्यकर्ते सांगतात, पण पक्षाची शिस्त मोडत इच्छुक उमेदवारांनी ‘सागर’ बंगल्यावर शक्तिप्रदर्शन सुरुवात केली आहे. नाशिकमधून देवयानी फरांदे यांना यादीत स्थान न दिल्यामुळे त्यांनी नगरसेवकांना सोबत घेऊन ‘सागर’ बंगल्यावर मोठे शक्तिप्रदर्शन केले. आजही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना भेट मिळाली नसल्याचे सांगण्यात येते. माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना पहिल्या यादीत स्थान न दिल्यामुळे उमेदवारीसाठी त्यांनीही ‘सागर’ बंगल्यावर धाव घेतली.

बंडखोरीच्या लाटा

नाशिक पूर्वमधून सीमा हिरेंना उमेदवारी दिल्याने या दिनकर पाटील यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले तर ठाण्यात संजय केळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज मीनाक्षी शिंदे यांनीही बंडाचे निशाण हाती घेतले. आर्वीचे आमदार दादाराव केचे यांचे तिकीट कापून देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव सुमीन वानखेडे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. पुणे कँटोन्मेंटमधून सुनील कांबळे यांच्या जागेवर माजी नगरसेवक भर वैरागे यांनी दावेदारी केली आहे. चांदवड-देवळा मतदारसंघातून आमदार डॉ. राहुल आहेर यांनाच उमेदवारी दिल्याने इच्छुक वेदा आहेर समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. देवळा नगरपंचायतीतील 17 नगरसेककांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

राज पुरोहित आक्रमक

माजी मंत्री राज पुरोहित यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे, पण राज पुरोहित यांनी याच मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस हे राज पुरोहित यांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत.

सुनील राणे यांचा पत्ता कट

भाजपने बोरिवलीतील विद्यमान आमदार सुनील राणे यांना अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे ते कमालीचे नाराज आहेत. या मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टीचे याचे तिकीट कापून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गोपाळ शेट्टी विधानसभेसाठी आग्रही आहेत.