लक्षवेधक वृत्त – सोने-चांदीच्या किमती घसरल्या

सराफा बाजारात सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. सोन्याच्या किमतीत 1133 रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या किमतीतही 1948 रुपयांची घसरण झाल़ी सोन्याचा भाव प्रति तोळय़ासाठी 71 हजार 613 रुपये झाला, तर चांदीचा प्रति किलोसाठी दर 88718 रुपयांपर्यंत खाली आला.

शेअर बाजारात चढउतार

सोमवारी शेअर बाजारात दिवसभर चढ-उतार पाहायला मिळाला. शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. परंतु, नंतर रिकव्हरी झाली. सेन्सेक्स अखेर 77,341 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 23,537 अंकावर बंद झाला. फार्मा, खासगी बँका आणि मेटल शेअरमध्ये घसरण झाली.

रजनीकांतसलमान एकत्र दिसणार

तमिळ सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हे चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. शाहरूख खान सोबत जवान चित्रपट करणारे दिग्दर्शक एटली या दोघांना आगामी चित्रपटासाठी एकत्र आणणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सन पिक्चर्स या बिग बजेट चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

बिर्याणीच्या चिकन पिसमध्ये अळी

हैदराबादची चिकन बिर्याणी जगभरात फेमस आहे. परंतु, ऑनलाईन बिर्याणी मागवणाऱया एका व्यक्तीला चिकन पिसमध्ये अळी सापडली. साई तेजा असे या तरुणाचे नाव असून त्याने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. याप्रकरणी स्विगीने माफी मागितली असून ग्राहकाचे 64 रुपये परत केले आहेत.

दिल्लीत सीएनजीच्या किमतीत वाढ

महागाईने आधीच होरपळणाऱया सर्वसामान्यांचा खिसा पुन्हा एकदा खाली होणार आहे. दिल्लीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. सीएनजी ऑटोमोबाईल आणि पाईप्ड कुकिंग गॅसची विक्री करणारी पंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड पंपनीने ही दरवाढ केली. पंपनीने सीएनजीच्या किमतीत 1 रुपयांची वाढ केली.

कलबुर्गी एअरपोर्टवर बॉम्बची अफवा

कर्नाटकच्या कलबुर्गी एअरपोर्टला ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली. आज सकाळी 6.54 वाजता ही धमकी मिळाली. टर्मिनल बिल्डिंगच्या बाथरूममध्ये पाच बॉम्ब ठेवले आहेत, अशी  धमकी मिळाल्यानंतर तत्काळ विमानतळात शोधमोहीम राबविण्यात आली. परंतु ही अफवा निघाली.

रीलसाठी तरुणांनी जीव धोक्यात घातला!

रीलसाठी वाट्टेल ते करणाऱया तरुणांची संख्या प्रचंड वाढली आहे. रीलला जास्त लाईक आणि कमेंट मिळाव्यात यासाठी गुजरातमधील दोन तरुणांनी थार कारसोबत समुद्रात स्टंट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा स्टंट त्यांच्या चांगलाच अंगलट आला. गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा येथील समुद्रात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. समुद्राच्या किनाऱयावरील थार कार समुद्रात बुडता बुडता वाचली. स्थानिक लोकांनी या दोन्ही तरुणांचा जीव वाचवला. त्यांना सुखरूप बाहेर काढले. याप्रकरणी दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

35 हजार लिथियम आयन बॅटरी जळून खाक

दक्षिण कोरियात लिथियम आयन बॅटरी बनवणाऱया फॅक्टरीला भीषण आग लागली. या आगीत 21 कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. तसेच 35 हजार लिथियम आयन बॅटरी या आगीत जळून खाक झाल्या आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. दक्षिण कोरियाची प्रमुख बॅटरी निर्माता पंपनी एरिसेल पंपनीचे या आगीत मोठे नुकसान झाले आहे. लिथियम आयनने पेट घेतल्याने राखाडी रंगाचा धूर मोठय़ा प्रमाणात पसरला होता. या आगीत सर्व बॅटरी जळून खाक झाल्या.

रशियात दहशतवादी हल्ले

दहशतवाद्यांनी रशियातील दागेस्तानमधील डर्बेंट शहरातील दोन चर्च, एक सिनेगॉग (ज्यू मंदिर) आणि पोलीस चौकीवर हल्ला केला. यामध्ये एक पादरी आणि आठ पोलिसांसह एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. तसेच 25 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात चार दहशतवादीही मारले गेले आहेत. रशियाच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी समितीनेही एका निवेदनात या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.