लक्षवेधक वृत्त – डिबेटः बायडन आणि ट्रम्प यांच्यात जोरदार खडाजंगी!

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. या दरम्यान होणाऱया अध्यक्षीय चर्चेत राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार वादविवाद झाला. अटलांटा येथे एका चॅनेलच्या मुख्यालयात ही चर्चा झाली. या पहिल्या चर्चेत दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दोघांनी सुरुवातीला अर्थव्यवस्थेवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी नाणेनिधी, नोकऱया आणि कर रचनेवरून एकमेकांवर हल्लाबोल केला. ट्रम्प यांनी युक्रेन युद्धावरूनही बायडन यांना लक्ष्य केले. जर मी राष्ट्राध्यक्ष असतो, तर युक्रेन युद्ध सुरू होऊ दिले नसते, असे ट्रम्प म्हणाले.

इस्रायल लेबनानवर हल्ल्याच्या तयारीत

गाझा पट्टीच्या खान यूनिस आणि राफा शहरात हल्ला करून प्रचंड हानी पोहोचवल्यानंतर इस्रायलने आता हिजबुल्लाहला लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. इस्रायलने लेबनानच्या सीमेवर आपले सैनिक तैनात केले आहेत. इस्रायलने लेबनानला लक्ष्य करण्याची घोषणा केली. लेबनानमधील परिस्थिती पाहून अमेरिका आणि हिंदुस्थान या दोन्ही देशांनी आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत. तसेच रशियानेही आपल्या नागरिकांना सल्ला दिला की, जोपर्यंत परिस्थिती ठीक राहत नाही, तोपर्यंत लेबनानचा दौरा करू नये, असे म्हटले आहे.

18 सप्टेंबरला दुसरे चंद्रग्रहण

2024 मधील दुसरे चंद्रग्रहण हे 18 सप्टेंबरला लागणार आहे. 18 सप्टेंबरला सकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होऊन 10 वाजून 17 मिनिटांना संपेल. हे चंद्रग्रहण सूर्योदय होण्याआधीच समाप्त होईल.

श्रीलंकेत 60 हिंदुस्थानींना अटक

श्रीलंकेत गुन्हे तपास विभागाने ऑनलाईन आर्थिक घोटाळा प्रकरणात 60 हिंदुस्थानी नागरिकांना अटक केली. श्रीलंका सीआयडीने या छापेमारीत 135 मोबाईल फोन आणि 57
लॅपटॉपसुद्धा जप्त केले.

अरुंधती रॉय यांना ‘पेन पिंटर’ पुरस्कार

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना ‘पेन पिंटर 2024’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘पेन पिंटर हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अरुंधती रॉय यांनी आनंद व्यक्त केला आहे. 10 ऑक्टोबर रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

गौतम सिंघानिया पुन्हा रेमंडचे एमडी

रेमंड कंपनीने पुन्हा एकदा गौतम हरी सिंघानिया यांची पुढील पाच वर्षांसाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून नियुक्ती केली. कंपनीच्या या निर्णयाला रेमंडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी मान्यता दिली. गौतम सिंघानिया यांचा नवा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली आहे. घटस्फोट प्रकरणावरून गौतम सिंघानिया चर्चेत आले होते.