टर्म इन्शुरन्सकडे महिलांचा कल वाढला

आर्थिक नियोजन करताना टर्म इन्शुरन्सची भूमिका महत्त्वाची ठरते. दीर्घकालीन योजनांचा विचार करताना तज्ञ मंडळीही लोकांना टर्म इन्शुरन्सचा विचार करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे केवळ पुरुषच नव्हे तर महिला टर्म इन्शुरन्सचा विचार करू लागल्या आहेत. त्याकडे महिलांचा कल वाढताना दिसत आहे.

इन्शुरन्ससंदर्भात ऑनलाईन सेवा देणाऱ्या ‘पॉलिसीबाजार’ने नुकताच एक अहवाल तयार केला आहे. गेल्या दोन वर्षांत महिलांनी खरेदी केलेल्या टर्म प्लॅनच्या संख्येत 80 टक्के एवढी लक्षणीय वाढ झाली आहे. या कालावधीत हाय कव्हरसह पॉलिसी खरेदीमध्ये 120 टक्के वाढ झाली आहे. महिलांची अधिक कव्हरेज असलेल्या पॉलिसींना जास्त पसंती आहे.

दिल्ली सर्वात पुढे

टर्म इन्शुरन्स घेण्यामध्ये नोकरदार महिला पुढे आहेत. त्या अधिक कव्हर निवडत आहेत. 2022 पासून 2 कोटी किंवा त्याहून अधिक कव्हरसह टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याचा ट्रेंड जवळजवळ दुप्पट झाला आहे. यातही दिल्लीच्या महिला सर्वात पुढे आहेत. दिल्लीच्या 8 ते 10 टक्के महिलांनी टर्म इन्शुरन्स खरेदी केलाय. त्याखालोखाल हैदराबादच्या महिला आहेत.