इंडिगो फ्लाईटमधील पॅक्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक

 

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये जे पॅक्ड फूड दिले जाते, त्यामध्ये मॅगीपेक्षा जास्त सोडियम असल्याची धक्कादायक बाब एका सोशल मीडिया हेल्थ इन्फ्लुएन्सरने उघड केली आहे. यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. याची दखल घेऊन इंडिगोलाही आपली बाजू मांडावी लागली.

रेवंत हिमतसिंगका असे हेल्थ इन्फ्लुएन्सरचे नाव आहे. ‘फूड फार्मर’ या नावाने तो ओळखला जातो. त्याने एअरलाइन्समध्ये दिल्या जाणाऱया अन्नाचा नुकताच आढावा घेतला. त्यानंतर रेवंतने सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यावर कॅप्शन देताना रेवंतने लिहिलंय, आपल्या सर्वांना माहीत आहे की, मॅगी हे उच्च सोडियमयुक्त खाद्य आहे, पण आपल्याला हे माहीत नाही की, इंडिगोच्या मॅजिक उपम्यामध्ये मॅगीपेक्षा 50 टक्के जास्त सोडियम आहे. इंडिगोच्या पोह्यात मॅगीपेक्षा 83 टक्के जास्त सोडियम आहे, तर दाल चावलमध्ये  मॅगीएवढे सोडियम आहे. हे पोहा, उपमा, दाल-चावल आरोग्यवर्धक वाटतात, पण तसे नाहीत. हे सगळं जंक फूडपेक्षाही धोकादायक आहे. हिंदुस्थानी आधीच सोडियमचे जास्त सेवन करत आहेत. नियमित अतिरिक्त सोडियमच्या सेवनाने आपला रक्तदाब वाढतो. परिणामी हृदयाच्या, किडनीच्या समस्या उद्भवतात, अशी पोस्ट रेवंतने लिहिली. काही तासांतच रेवंतची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. अनेकांनी  त्यावर आपले मत मांडले. दरम्यान, देशभरात विमानातून लाखो लोक प्रवास करतात. प्रवासादरम्यान, विमानात दिले जाणारे अन्नाचे सेवन करतात, परंतु रेवंतच्या व्हिडीओने या प्रवाशांची चिंता वाढली आहे.

 

एअरलाइन्सचे स्पष्टीकरण

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इंडिगोनेही त्याची दखल घेऊन अन्नात मिठाचे प्रमाण नियमाप्रमाणे असल्याचा दावा केला. इंडिगो फक्त नामांकित विक्रेत्यांकडून ताजे आणि फ्री पॅकेज केलेले अन्न पुरवते.  इंडिगो फ्लाईटमध्ये दिल्या जाणाऱया सर्व खाद्यपदार्थांमध्ये घटक आणि पौष्टिक माहितीचा तपशील असतो. प्रवाशांना ताजे तयार केलेले फ्री- बुक जेवण किंवा फ्री पॅकेज केलेले खाद्यपदार्थ असे पर्याय असतात. यामध्ये मिठाचे प्रमाण नियमानुसार असते. पॅकेजवर छापलेली माहिती प्रवाशांना पौष्टिकतेचा अंदाज लावण्यासाठी आणि विवेकबुद्धीने निवड करण्यासाठी असते, असेही इंडिगोने म्हटले आहे.