हिंदुस्थानच्या किरण पहलला ऑलिम्पिकचे तिकीट, चारशे मीटर शर्यतीत ठरली पात्र

हिंदुस्थानची महिला धावपटू किरण पहल हिने राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करीत आगामी महिन्यात होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. किरणने 400 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीत 50.52 सेकंद वेळ नोंदवित ऑलिम्पिकची पात्रता मिळविली.

महिलांच्या 400 मीटर शर्यतीत ऑलिम्पिक पात्रतेसाठी 50.95 सेकंद वेळेची मर्यदा होती. किरण पहलने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम वेळ नोंदवित शर्यतीत बाजी मारली. गुजरातची देवी अनिबा जाला (53.44 सेपंद.) हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर तिसऱया स्थानी राहिलेल्या केरळच्या स्नेहाने 53.51 सेकंदांत शर्यत पूर्ण केली.