कोविडने जगभरात थैमान घातले. या महामारीने अनेकांचे बळी घेतले. कोविडच्या काळात जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. लॉकडाऊनचा परिणाम चंद्रावरही दिसून आलाय. कोविड लॉकडाऊनमुळे चंद्राचे तापमानही सामान्य तापमानापेक्षा कमी झाले होते, अशी माहिती आता एका अभ्यासामधून दिसून आलीय. लॉकडाऊन काळात पृथ्वीवरील तापमानात आणि प्रदूषणात घट नोंदवली गेली होती. आता त्याचा प्रभाव हा चंद्रापर्यंत झाल्याचा दावा हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनी केला आहे. रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या पीअर-रिह्यूडमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलेय की, कोविडच्या काळात एप्रिल-मे 2020 च्या कडक लॉकडाऊनच्या कालावधीत चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट दिसून आली आहे.
फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे (पीआरएल) के दुर्गा प्रसाद आणि जी अम्बिली यांनी 2017 व 2023 दरम्यान सहा वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे विश्लेषण केले. पीआरएलचे संचालक अनिल भारद्वाज म्हणाले की, ‘‘या संशोधनात असे आढळून आले की, इतर वर्षांच्या तुलनेत लॉकडाऊनच्या वर्षातील तापमान सामान्यपेक्षा 8 ते 10 केल्विनने कमी असल्याचे आढळून आले आहे.’’
कसा केला अभ्यास
या संशोधनासाठी नासाच्या चंद्र रीकोनिसन्स ऑर्बिटरची मदत घेण्यात आली. यामध्ये 2017 ते 2023 यादरम्यान चंद्रावर सहा विविध ठिकाणी रात्रीच्या वेळी झालेल्या बदलांचे निरीक्षण करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात चंद्राच्या तापमानामध्ये इतर वर्षांच्या तुलनेत सातत्याने 8-10 केल्विनची घट झाल्याचे दिसले.