अदानींच्या तेल वाहिनीला गळती; उग्र वासाने उरणकर घुसमटले

उरण धुतूम येथील इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या गलथान कारभारामुळे पोगोटे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तेल वाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे वाहणारे तेल रस्त्यावर साचले आहे. तेलाच्या तवंगामुळे आजूबाजूला असलेली झाडेही करपून गेली असून तेलाच्या उग्र वासाने उरण मार्गावरील वाहनचालक, परिसरातील नागरिक बेजार झाले आहेत.

नुकतेच कंपनीने पागोटे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उड्डाणपुलाखालील जागेतून जाणाऱ्या तेल वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र तेल वाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामात काही त्रुटी राहून गेल्याने तेल गळती सुरू झाली आहे. या गळतीमुळे पावसाच्या पाण्यात आता तेलाचा तवंग पसरला आहे. या तेलाला आग लागण्याचाही धोका आहे. तेलाच्या उग्र वासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र कंपनीच्या गलथान या तेलाच्या तवंगामुळे कोणताही धोका नसल्याचा दावा अदानी वेंचर्सच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

कारभारामुळे रस्त्यावर पसरलेल्या तेल तवंगाची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. पाहणी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.
डॉ. उद्धव कदम, तहसीलदार

रासायनिक द्रव्यांची साठवणूक
धुतूम येथे इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनी आहे. जेएनपीए बंदरातील लिक्विड जेट्टीपासून धुतूमपर्यत दोन फूट व्यासाच्या तेल वाहिन्यांतून थेट कंपनीतील १० हजार किलो क्षमतेच्या टाक्यात वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक द्रव्य साठवणूक करून वितरण करण्यात येतात. यामध्ये ज्वलनशील, विषारी आणि घातक क्रूड ऑइल, नाफ्था, डिझेल, पेट्रोल व इतर रासायनिक द्रव्य पदार्थांचाही समावेश असतो.