सोमालियन चाचांनी ताब्यात घेतलेल्या एमव्ही लिला नॉरफोक या व्यापारी जहाजावरील 15 हिंदुस्थानींसह एकूण 21 कर्मचाऱयांची हिंदुस्थानच्या नौदल कमांडोंनी सुखरूप सुटका केली.
हे जहाज सहा ते सात बुरखाधारी सशस्त्र सागरी चाच्यांनी काही काळ ताब्यात घेतले होते. मात्र, नौदलाचे सागरी गस्ती विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या घिरटया या जहाजावरून सुरू झाल्यावर या चाच्यांनी पलायन केले. या जहाजाच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या आयएनएस चेन्नई युद्धनौकेवरील कमांडोंनी जहाजावर जाऊन सर्व जहाजाची बारकाईने तपासणी केली. त्यांना एकही चाचा जहाजावर आढळला नाही. सागरी गस्ती विमानाने या चाच्यांना युद्धनौका येत असल्याबद्दल दिलेल्या इशाऱयामुळे घाबरून त्यांनी पलायन केले असावे, असा अंदाज आहे.