नजर पोहचत नाही तिथे अचुक मारा करणारं ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र वायुदलाच्या ताफ्यात दाखल

भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) या कंपनीने बनवलेल्या अस्त्र (Astra BVR) क्षेपणास्त्र हिंदुस्थानी वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. वेग आणि अचूक निशाना ही या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य आहे. हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या या क्षेपणास्त्रामुळे चीन आणि पाकिस्तान यांना मात्र धडकी भरली आहे.

अस्त्र क्षेपणास्त्राचा हिंदुस्थानी वायुसेनेत समावेश होत असल्यामुळे हिंदुस्थानी वायुसेनेच्या ताकदीमध्ये दुप्पट वाढ होणार आहे. अस्त्र क्षेपणास्त्र हे हवेतून हवेत मारा करणारे उच्च दर्जाचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे जिथे फायटर जेट किंवा हेलिकॉप्टरचा पायलट पाहू शकत नाही. अशा ठिकाणी सुद्धा अस्त्र  क्षेपणास्त्र अचूकपणे हल्ला करण्याची क्षमता ठेवते. नुकतेच तेजस या लढाऊ विमानातून गोळीबार करण्यात आला होता. तेजस फायटर जेटने 20 हजार फुट उंचीवरून क्षेपणास्त्र डागत अचूक लक्ष गाठले. या क्षेपणास्त्राचा पुढील प्रकार, MK-2 देखील चाचणी टप्प्यात असून हे लांब पल्याचे क्षेपणास्त्र असणार आहे. सध्या अॅस्ट्रा-एमके 1 (Astra-MK1) हे क्षेपणास्त्र लष्करात सामील करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अस्त्र एमके-1 या क्षेपणास्त्राच्या कामगिरीवर हवाई दल समाधानी असून 200 क्षेपणास्त्र मागवले जाण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्रामध्ये ऑप्टिकल प्रॉक्सिमिटी फ्यूज असल्यामुळे हे क्षेपणास्त्र लक्षावर अचूक लक्ष ठेवते. या क्षेपणास्त्राचे वजन 154 किलो असून लांबी 12.6 फुट तर व्यास 7 इंच आहे.

या क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे लक्षाच्या दिशेने क्षेपणास्त्र सोडल्यानंतल त्याची दिशा हवेत बदलता येते. कारण हे फायबर ऑप्टिक गायरो सर्वोत्तम इनर्शिअऱ नेव्हिगेशन प्रणालीवर काम करते. या क्षेपणास्त्राचा पहिला प्रकार MIG-29UPG/MiG29K, Sukhoi Su-30MKI, Tejas MK.1/1A मध्ये स्थापित करण्यात आला आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून हे क्षेपणास्त्र तेजस एमके 2, एएमसीए, टीईडीबीएफ लढाऊ विमानांमध्येही बसवण्यात येणार आहे. हिंदुस्थानी हवाई दलाने जुन्या एमआयसीए क्षेपणास्त्राच्या जागी स्वदेशी शस्त्रास्त्रावर विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे अॅस्ट्रा क्षेपणास्त्राची रचना डीआरडीओने केली आहे. ज्या ठिकाणी नजर पोहचतं नाही अशा ठिकणी या क्षेपणास्त्राचा वापर करून लक्षावर अचूक मारा करता येणार आहे. एमके 2 या क्षेपणास्त्राच्या नंतर एमके 3 हे क्षेपणास्त्र बनवण्यात येईल. एमके 3 या क्षेपणास्त्राची रेंज 250 किलोमीटर असेल.