शुभारंभासाठी सज्ज; दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका बरोबरीत सोडविण्याचा हिंदुस्थानचा निर्धार

दक्षिण आफ्रिकन भूमीवर कसोटी मालिका विजयाचे हिंदुस्थानचे पहिल्या कसोटीतील पराभवामुळे स्वप्न धुळीस मिळाले आहे. पण आता किमान मालिकेत बरोबरी राखण्याच्या आणि नववर्षाची विजयाने सुरुवात करण्याच्या ध्येयाने-निर्धाराने रोहित ऍण्ड कंपनी न्यूलॅण्ड्सवर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. दुसरीकडे यजमान दक्षिण आफ्रिका गेल्या 31 वर्षांपासून सुरू असलेली मालिका विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी हिंदुस्थानशी भिडणार आहे. दोघांचे ध्येय विजयाचे असले तरी हिंदुस्थानला केवळ विजयच आनंद देऊ शकतो.

पहिल्या कसोटीत हिंदुस्थानची वेगवान गोलंदाजी उघडी पडल्यामुळे न्यूलॅण्ड्सवर संघात काही बदल अपेक्षितच आहेत. अष्टपैलू रवींद्र जाडेजा मधल्या फळीत आला आहे. हिंदुस्थानी संघाची मुख्य अडचण आहे ती वेगवान गोलंदाजीची. प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूरचे अपयश आता लपलेले नाही. त्यामुळे हे दोघेही संघाबाहेर जाण्याचीच अधिक शक्यता आहे. मुकेश कुमारला संधीची शक्यता आहे. फलंदाजीत बदलाची कोणतीही शक्यता नाही, मात्र यशस्वी जैसवाल, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना आपला खेळ दाखवावा लागणार आहे. याचे अपयश हिंदुस्थानी संघाच्या पराभवाचेही मुख्य कारण ठरले आहे.

रोहितला खेळावेच लागेल

रोहित शर्माला हिंदुस्थानी फलंदाजीत जोश भरण्यासाठी स्वतःलाही मैदानात सिद्ध करावे लागेल. पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत त्याने अपयशी आणि निराशाजनक खेळ केल्यामुळे त्यालाही टीकेला सामोरे जावे लागले होते. जर रोहित आपल्या फलंदाजीत दमदार खेळ करण्यात अपयशी ठरल्यास त्याच्या नेतृत्वावरही टीकेची झोड उठू शकते. याची खुद्द रोहितलाही कल्पना आहे. त्यामुळे केपटाऊनला त्याला खेळावेच लागणार. तसे पाहता पहिल्या अपयशी कसोटीत पहिल्या डावात के. एल. राहुल तर दुसऱया डावात विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली होती. अन्य फलंदाजी सुपरस्पोर्ट्सच्या वेगवान खेळपट्टीवर सुपर फ्लॉप ठरले होते. न्यूलॅण्ड्सची खेळपट्टीही वेगवान गोलंदाजीला पोषक असल्यामुळे जसप्रीत बुमरा-मोहम्मद सिराजला आपल्या गोलंदाजीची धार दाखवावी लागणार आहे, अन्यथा संघाचे काही खरे नसेल.

दक्षिण आफ्रिकेचेच पारडे जड

पहिल्या कसोटीत हिंदुस्थानचा तिसऱयाच दिवशी पराभव केल्यामुळे दुसऱया कसोटीतही यजमानांचेच पारडे जड आहे आणि तसेही न्यूलॅण्ड्सची खेळपट्टी नेहमी त्यांनाच फळली आहे. पहिल्या कसोटीचा हीरो डीन एल्गरच्या कसोटी कारकीर्दीला ग्रॅण्ड निरोप देण्यासाठी त्यांचे सारे खेळाडू सज्ज झाले आहेत. गेल्या 31 वर्षांच्या इतिहासात हिंदुस्थान केवळ 2010 साली कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्यात यशस्वी ठरला होता. नेमके हेच हिंदुस्थानला करू न देण्याचे आफ्रिकेचे प्रयत्न आहेत. एकतर त्यांना कसोटी जिंकायची किंवा अनिर्णित राखायचीय. या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकन मार्करम, झॉर्झी, पीटरसन या फलंदाजांना रोखण्याचे हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर पहिले आव्हान असेल. हिंदुस्थानचे यशापयश गोलंदाजांवर अवलंबून असले तरी नव्या दमाच्या फलंदाजांनी कसोटीत कसोटीला साजेसाच खेळ करावा, असा सल्ला दिग्गजांना दिलाय. या सल्ल्याला किती गांभीर्याने घेतले गेलेय ते उद्या कळेलच.