रथी-महारथी फलंदाजांनी सजलेल्या हिदुस्थानचे न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या कसोटी सामन्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर अक्षरशः वस्त्रहरण केले. बांगलादेशविरुद्ध डरकाळय़ा फोडणाऱ्या हिंदुस्थानी वाघांनी किवींच्या वेगवान जोडगोळीपुढे पहिल्या डावात 31.2 षटकांतमध्ये म्याव म्याव करत केवळ 46 धावांवरच शरणागती पत्करली. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने हिंदुस्थानच्या नाकावर टिच्चून उर्वरित 50 षटकांच्या खेळात पहिल्या डावात 3 बाद 180 धावसंख्येपर्यंत मजल मारत कसोटीवर आपली पकड मजबूत केली. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा रचिन रवींद्र 22, तर डॅरिल मिचेल 17 धावांवर खेळत होते.
निम्मा संघ शून्यावर बाद
हिंदुस्थान-न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिला दिवस पावसात वाहून गेल्यानंतर दुसऱया दिवशी पाहुण्या न्यूझीलंडचा बोलबाला बघायला मिळाला. नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय टीम इंडियाच्या चांगलाच अंगलट आला. विराट कोहली, सरफराज खान, लोकेश राहुल, रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन या दिग्गज पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. हिंदुस्थानसाठी मधल्या फळीतील ऋषभ पंतने सर्वाधिक 20 धावांची खेळी केली, तर सलामीवीर यशस्वी जैसवाल (13) दुहेरी धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. कर्णधार रोहित शर्मा (2), कुलदीप यादव (2), जसप्रीत बुमराह (1) व मोहम्मद सिराज हे फलंदाजही फक्त हजेरीवीर ठरल्याने हिंदुस्थानचा पहिला डाव 46 धावांवरच गारद झाला.
दुष्काळात तेरावा महिना
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतने लक्षवेधी फलंदाजी केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हिंदुस्थानचा पहिल्या डावात 46 धावांवर खुर्दा उडाला, त्यातही पंतच्याच सर्वाधिक 20 धावांचा समावेश आहे. मात्र त्यानंतर यष्टिरक्षण करताना ऋषभ पंत जायबंदी झाला अन् टीम इंडियासाठी ही घटना दुष्काळात तेरावा महिना ठरली. न्यूझीलंडच्या डावाच्या 37 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंतला ही दुखापत झाली. गोलंदाजी करणाऱया रवींद्र जाडेजाने कॉन्वेच्या फूटमार्कजवळ टाकलेला चेंडू अचानक वेगाने फिरला. कॉन्वेने ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चुकला अन् चेंडू यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या गुडघ्याला लागला. चेंडू लागताच पंत जमिनीवर पडला आणि वेदनेने कळवताना दिसला. सामना थांबवण्यात आला आणि पंतला पाहण्यासाठी टीम इंडियाचे फिजिओ मैदानावर आले. त्यांच्या प्रयत्नानंतरही पंतला नीट उभेही राहता येत नव्हते. यानंतर फिजिओच्या सल्ल्यानुसार ऋषभ पंतने पायाचा पॅडही काढला आणि नंतर लगेच दुसरा यष्टिरक्षक ध्रुव जुरेलला आत येण्यास सांगितले. तणावाची गोष्ट म्हणजे ऋषभ पंतचा हाच उजवा गुडघा अपघातात जखमी झाला होता.
मायदेशातील नीचांक
ज्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो त्याच मैदानावर टीम इंडियाने 46 धावांत लोटांगण घालत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मायदेशातील नीचांकी धावसंख्येचा नकोसा विक्रम केला. याआधी 1979 मध्ये हिंदुस्थानी संघ मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध 75 धावांत गारद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या होय. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला अॅडलेडमध्ये 36 धावांत गुंडाळले होते, तर 1994 मध्ये इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत हिंदुस्थानचा डाव 42 धावांवर संपविला होता. याचबरोबर टीम इंडियाची 46 ही धावसंख्या आशिया उपखंडातील कसोटी क्रिकेटची नीचांकी धावसंख्या ठरली. याआधी 1986 मध्ये वेस्ट इंडीजने पाकिस्तानला आशिया उपखंडातील कसोटी सामन्यात 75 धावांवर गारद केले होते. पाकिस्तानच्या नावावरील हा नकोसा विक्रम आज हिंदुस्थानच्या नावावर लागला.
कॉन्वेला शतकाची हुलकावणी
ज्या खेळपट्टीवर संपूर्ण टीम इंडियाला धावफलकावर अर्धशतकही लावता आले नाही, त्याच खेळपट्टीवर डेव्हन कॉन्वे (91) व कर्णधार टॉम लॅथम (15) यांनी न्यूझीलंडसाठी 67 धावांची खणखणीत सलामी दिली. ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवने लॅथमला पायचीत पकडून ही सलामीची जोडी फोडली. त्यानंतर कॉन्वेने आलेल्या विल यंगच्या (33) साथीत दुसऱया विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. रवींद्र जाडेजाने यंगला कुलदीपकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला दुसरे यश मिळवून दिले. मग रविचंद्रन अश्विनला रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात कॉन्वे यष्टय़ा गमावून बसला. अवघ्या 9 धावांनी त्याला शतकाने हुलकावणी दिली. त्यानंतर रचिन रवींद्र व मिचेल यांनी अधिक पडझड होऊ दिली नाही.
हेन्री, ओरोर्कने उडविली दाणादाण
वेगवान गोलंदाज टीम साऊदीने रोहित शर्माचा 2 धावांवर त्रिफळा उडवून न्यूझीलंडला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर मॅट हेन्री व विल्यम ओरोर्क या वेगवान जोडगोळीपुढे हिंदुस्थानी फलंदाजांची दाणादाण उडाली. हेन्रीने 5, तर ओरोर्कने 4 विकेट टिपत हिंदुस्थानी फलंदाजीची लाज काढली.