टप्प्यात येताच कार्यक्रम होणार, स्वदेशी ‘एस-400’ एअर डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी

चीन आणि पाकिस्तानसारखे खुसपट काढणारे शेजारी असल्याने हिंदुस्थानला अखंड सावध रहावे लागते. यासाठी लष्कराला डोळ्यात तेल घालून सीमेवर जागावे लागते. याला जोड मिळती ती म्हणजे शस्त्रास्त्रांची. गेल्या काही काळात हिंदुस्थानने स्वदेशी तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर भर दिला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओचे संशोधक यासाठी दिवसरात्र कार्य करत असतात. आताही डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली असून यामुळे शत्रुराष्ट्रांना धडकी भरली आहे.

डीआरडीओने 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी ओडिशातील समुद्रकिनाऱ्यावरील चांदीपूर येथे कमी अंतरावरील लक्ष्य भेदणाऱ्या हवाई संरक्षण प्रणालीची (व्हीएसआरएडीएस) यशस्वी चाचणी घेतली. ही प्रणाली रशियाच्या ‘एस-400’ या हवाई संरक्षण प्रणालीप्रमाणेच काम करते. हवाई संरक्षण प्रणालीनुसार या क्षेपणास्त्राचा वेग उत्कृष्ट असून यामुळे शत्रुची विमानं, हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांना टिपता येणार आहे.

व्हीएसआरडीएसचे वजन 20.5 किलोग्रॅम आहे. याची लांबी 6.7 फूट असून रुंदी 3.5 फूट आहे. 2 किलोग्रॅम वजनाची शस्त्रे याद्वारे डागता येणार असून याची रेंज 250 मीटर ते 6 किलोमीटर आहे. हवेतमध्ये हे क्षेपणास्त्र 11500 फुटांपर्यंत जाऊ शकते. याचा कमाल वेग मॅक 1.5 अर्थात ताशी 1800 किलोमीटर वेगाने हे क्षेपणास्त्र शत्रुवर हल्ला करेल. याआधी गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये याची चाचणी घेण्यात आली होती.

जमिनीवर असणाऱ्या मॅन पोर्टेबल लॉन्चर्समधून व्हीएसआरडीएस क्षेपणास्त्र डागता येते. याचाच अर्थ एखादा लष्करी सैनिक कोणत्याही ठिकाणावरून हे क्षेपणास्त्र डागू शकतो. चीनच्या सीमेवरील पर्वत रांगा किंवा पाकिस्तानच्या सीमेजवळील वाळवंटामधूनही अगदी सहजपणे हे क्षेपणास्त्र डागता येईल आणि याद्वारे विमान, फायटर जेट, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र किंवा ड्रोनचाही वेध घेता येईल.

व्हीएसआरडीएस हे मुळात कमी अंतरावर मारा करणारे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र असून रशियाच्या एस-400 हवाई संरक्षण प्रणालीप्रमाणे काम करते. ही हवाई संरक्षण प्रणाली देशातच विकसित करण्यात आली असून यासाठी डीआरडीओने हैदराबाद येथील रिचर्स सेंटरची मदत घेतली आहे. या क्षेपणास्त्रामध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे क्षेपणास्त्राचा वेगही वाढला आहे.