राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसावर हिंदुस्थानचे राज दिसले. दोन शतके आणि एका आक्रमक अर्धशतकाने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना खूश केले. 3 बाद 33 अशी संकटातून सहीसलामत बाहेर काढताना रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा या अनुभवी फलंदाजांनी इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ला फोडून काढत साजरे केलेली शतके आणि पदार्पणवीर सरफराज खानच्या वेगवान अर्धशतकाने पहिल्या दिवसाचा खेळ हिंदुस्थानच्या नावावर नोंदवला. हिंदुस्थानने पहिल्या दिवशी 5 बाद 326 अशी दमदार मजल मारली. खेळ थांबला तेव्हा जाडेजा 110 तर कुलदीप यादव एका धावेवर खेळत होता.
मालिकेत 1-1 अशी बरोबरी असल्यामुळे राजकोटवर राज्य गाजवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज होते. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. संघात सरफराज खान आणि यष्टिरक्षक ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी दिली. आज हिंदुस्थानच्या नवा पिढीकडून अपेक्षा होती, पण त्यांनी निराशाजनक खेळ करत रोहितचाच घाम काढला होता. पण गेले आठ डाव अपयशी ठरलेल्या रोहितने रवींद्र जाडेजाच्या मदतीने संकटमोचकाची भूमिका निभावत संघाला सावरले आणि मोठी धावसंख्याही उभारून दिली. दिवसाची सुरुवात 3 बाद 33 खराब झाली असली तरी शेवट मात्र 5 बाद 326 असा सुखद होता.
आरआर का जादू चल गया…
आज इंग्लंडच्या आक्रमक खेळापुढे हिंदुस्थानच्या नव्या आणि भावी पिढीची कसोटी होती. नव्या पिढीने घात केला. गेल्या सामन्यात द्विशतकी खेळी करणारा यशस्वी जैसवाल आज रोहित शर्मासमोर दमदार सलामी देण्यात अपयशी ठरला. यशस्वी हा मार्क वूडच्या आऊटक्विंगवर फसला आणि त्यानंतर वूडने पुढच्या षटकात शुबमन गिलला भोपळासुद्धा पह्डू दिला नाही. तसेच दुसराच सामना खेळत असलेल्या रजत पाटीदारने मिळालेल्या संधीची माती केली. त्यामुळे हिंदुस्थानची 3 बाद 33 अशी बिकट अवस्था होती. तेव्हा रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा या हिंदुस्थानच्या अनुभवी फलंदाजांनी संघाला सावरले. ‘बॅझबॉल’च्या संस्थापकांना आज रोहितने फटकावले. एकीकडे हिंदुस्थानची घसरगुंडी उडाली असताना 27 धावांवर जीवदान मिळालेल्या रोहितने आपला आक्रमक बाणा दाखवताना संघाला जाडेजाच्या साथीने संकटातून बाहेर काढले. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा हिंदुस्थान 3 बाद 93 अशा स्थितीत होता. त्यानंतर रोहित आणि रवींद्रने इंग्लंडच्या गोलंदाजांना झुंजवत दुसऱया सत्रात 92 धावा काढल्या. दुसरे सत्र गाजवल्यानंतर रोहितने गेल्या आठ डावांतील 5, 0, 39, नाबाद 16, 24, 39, 14, 13 अशा अपयशी खेळींना पुसून काढताना आपले 11 वे कसोटी शतक झळकावले. त्याचबरोबर जाडेजाबरोबर चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीही पूर्ण केली. रोहितने वन डे क्रिकेटला साजेसा खेळ करताना हिंदुस्थानी डावाला मजबुती दिली. अखेर 204 धावांच्या भागीनंतर वूडनेच रोहितची खेळी 131 धावांवर संपवली.
पदार्पणवीर सरफराजचे राज्य
तिसऱया सत्रात सरफराज खानचेच राज्य चालले. एकीकडे जाडेजा नव्वदीत होता, तेव्हा सरफराज इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने 48 चेंडूंत 7 चौकार आणि एका षटकारासह आपले झंझावाती अर्धशतक साकारले. त्याच्याआधी 1934 साली पतियाळाचे युवराज यांनी इंग्लंडविरुद्ध 42 चेंडूंत तर 2017 साली हार्दिक पंडय़ाने लंकेविरुद्ध 48 चेंडूंत पदार्पणात अर्धशतक साकारले होते. सरफराजने धावबाद होण्यापूर्वी 79 धावांची भागी केली. यात त्याचा वाटा 62 धावांचा होता, तर जाडेजाने केवळ 15 धावा काढल्या होत्या. सरफराज बाद झाल्यावर जाडेजाने आपले चौथे शतक साजरे केले.
View this post on Instagram
…तर रुटच्या धावा हिंदुस्थानी संघापेक्षा जास्त असत्या
आजच्या कसोटीत हिंदुस्थानचे युवा खेळाडूच खेळणार हे नक्की होते. त्यातच रवींद्र जाडेजाबाबत साशंकता होती. जाडेजा फिट नसता तर संघात वॉशिंग्टन सुंदर उतरला असता. पण अंतिम अकरामध्ये जाडेजा आला. जर संघात जाडेजाऐवजी सुंदर खेळला असता तर हिंदुस्थानी संघातील सर्व खेळाडूंच्या धावा 9606 असत्या आणि या धावा इंग्लिश फलंदाज ज्यो रुटच्या 11,468 कसोटी धावांपेक्षा नक्कीच कमी आहेत. पण जाडेजा आला आणि हा विक्रम होता होता राहिला. सध्या खेळत असलेल्या कसोटी संघात रोहित (57), जाडेजा (70) आणि अश्विन (98) हेच तिघे 50 पेक्षा अधिक कसोटी खेळले आहेत.
अखेर माझ्या अब्बूचे स्वप्न सत्यात उतरले
माझ्या अब्बूंनी माझ्यासाठी पाहिलेले टेस्ट कॅपचे स्वप्न अखेर आज सत्यात उतरले. मी हिंदुस्थानकडून खेळावे हीच माझ्या अब्बूची (नौशाद खान) इच्छा होती. जी आज साकार झाल्याची भावना पदार्पणवीर सरफराज खानने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर व्यक्त केली. गेली अनेक वर्षे मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, मेहनत करत होतो. हिंदुस्थानच्या तीन विकेट पडताच मी पॅड बांधून बसलो होतो. त्यानंतर तब्बल चार तास मी पॅड बांधून पदार्पणाची वाट पाहत होतो. तेव्हा माझी धाकधूक खूप वाढली होती. पण तेव्हा मी माझ्या मनाला समजावले की, या क्षणाची आपण खूप दिवसांपासून वाट पाहतोय. त्यासाठी आपण थोडावेळ नक्कीच थांबू शकतो.
रात्रीला थोडा वेळ द्या… सूर्य आपल्या वेळेवरच उगवणार
जेव्हा मी सरफराजवर प्रचंड मेहनत घेत होतो तेव्हा मी सारखा विचार करायचो की, माझे स्वप्न सत्यात का उतरत नाही. पण आता सरफराजला पॅप मिळाल्यानंतर मी माझा विचार बदलला आहे. रात्र उलटण्यासाठी थोडा वेळ द्या, सूर्य आपल्या वेळेवरच उगवणार. सरफराजच्या अथक मेहनतीनंतरही निवड समिती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती तेव्हा मी त्याला संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हाच सर्व गोष्टी कामे करतील. कठोर मेहनत करणे, संयम बाळगणे आणि आशा सोडू नये, हेच सरफराजचे काम असल्याचे वडील नौशाद खान यांनी सांगितले.
3336 दिवसांची प्रतीक्षा संपली
28 डिसेंबरला 2014 ला सरफराज खानने ऐतिहासिक ईडन गार्डनवर बंगालविरुद्ध रणजी पदार्पण केले. त्यानंतर तो सातत्याने मुंबईसाठी धावांचा पाऊस पाडत होता, पण त्याच्या कामगिरीला न्याय मिळत नव्हता. अखेर हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची सरफराजची प्रतीक्षा 3336 दिवस आणि 3912 रणजी धावांनंतर संपली. रणजी पदार्पणानंतर इतकी वर्षे कुणालाही वाट पाहावी लागत नाही, पण ती सरफराजला पाहावी लागली.
View this post on Instagram
अन् रोहितचा राग अनावर झाला
आपल्या पदार्पणातच इंग्लिश गोलंदाजीवर तुटून पडलेल्या मुंबईकर सरफराज खानने क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. कसोटी पदार्पणाची संधी उशिरा मिळाली असली तरी आज सरफराजने संधी मिळताच त्याचे सोनं केलं. पदार्पणातच त्याने 48 चेंडूंत आपला अर्धशतकी टप्पा गाठला. त्याने 66 चेंडूंत 62 धावा केल्या होत्या, तेव्हा रवींद्र जाडेजाच्या चुकीच्या कॉलने त्याला धावबाद केले. जबरदस्त खेळत असलेला सरफराज दुर्दैवीरीत्या धावबाद होताच कर्णधार रोहित शर्माचा राग अनावर झाला आणि त्याने आपली कॅप आपटून राग व्यक्त केला. सरफराज बाद झाला तेव्हा स्टेडियममधील वातावरण पाहण्यासारखे होते. त्याच्या आक्रमक पदार्पणाला क्रिकेटप्रेमींनी उभे राहून टाळय़ांच्या कडकडाटात अभिवादन केले.
सरफराजने आपल्या या आक्रमक खेळीत 9 चौकार आणि एक षटकार ठोकला होता. डावातील 82 व्या षटकांतील पाचव्या चेंडूवर जाडेजाने अॅण्डरसनच्या मिडऑनला फटका मारला. तेव्हा जाडेजा 99 धावांवर खेळत होता, त्याने एकेरी धाव काढून आपले शतक पूर्ण करण्यासाठी सरफराजला आवाज दिला, पण तो थांबला. मात्र सरफराज धावण्यासाठी पुढे सरसावला आणि पुन्हा मागे जाईपर्यंत मार्क वूडच्या अचूक थ्रोने त्याला धावबाद केले. सरफराज धावबाद होताच जाडेजालाही वाईट वाटले.