
हरयाणातील हिसार येथील वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बूरा हिने तिचा पती, हिंदुस्थानच्या कबड्डी संघाचा माजी कर्णधारव भाजप नेता दीपक हुड्डा याच्यावर मारहाण केल्या आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. दीपकने एक कोटी रुपये आणि फॉर्च्यूनरची मागणी केली. एवढेच नाही तर श्वास कोंडेपर्यंत मारहाणही केली, असा गंभीर आरोप स्वीटीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक आणि त्याची बहीण पूनम यांच्याविरोधात कलम 115(3), 316(2), 351(3) आणि 85 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
स्वीटी बूरा आणि दीपक हुड्डा यांचे जुलै 2022 मध्ये लग्न झाले होते. मात्र अवघ्या तीन वर्षात दोघांचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. स्वीटी बूरा हिने दीपकविरोधात तक्रार दाखल केली असून घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मनात येईल तेव्हा मला मारहाण होत होती. श्वास कोंडेपर्यंत मारहाण केली जात होती. अनेक दिवस घरात कैद केले जात होते. एवढेच नाही तर हुंड्यात एक कोटी आणि फॉर्च्यूनरची मागणी करण्यात आली. ज्याच्यासाठी घरदार सोडले तोच पती कसाई निघाला, असा आरोप स्वीटी बूरा हिने केला आहे. ‘नवभारत टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
स्वीटी बूरा हिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून 50 लाख रुपये नुकसान भरपाई आणि दीड लाख रुपये मासिक खर्चाची मागणी केली आहे. याप्रकरणी स्वीटीने हिसार पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. एवढेच नाही तर तिने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पतीसोबतचे सर्व फोटोही डिलिट केले आहेत. तर दुसरीकडे दीपक हुड्डा यानेही स्वीटी आणि तिच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
स्वीटी आणि तिच्या कुटुंबाने मालमत्ता हडप करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिली. आपल्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याचाही आरोप दीपकने केला आहे. या प्रकरणी दीपकने रोहतक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दीपक हुड्डा याला नोटीस पाठवून चौकशीला बोलावले होते, मात्र तो चौकशीला हजर राहिला नाही. आता पोलीस पुढील कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
स्वीटीने तक्रारीत काय आरोप केले?
– एक कोटींचा हुंडा आणि फॉर्च्यूनर कारची मागणी
– हवा तसा हुंडा दिला नाही म्हणून मारहाण आणि शिवीगाळ
– बॉक्सिंग सोडून घरकाम करण्यास भाग पाडले
– नवरा पाच सहा दिवसांनी घरी यायचा, विचारल्यावर मारहाण करायचा, फक्त शारीरिक गरजांसाठी लग्न केल्याचे म्हणायचा
दीपकने तक्रारीत काय म्हटले?
– स्वीटीच्या वडिलांनी लाखो रुपयांची फसवणूक केली, बहिणीनेने लाखोंचा चुना लावला
– माझ्यावर चाकूने हल्ला केला, झोपेत असताना डोके फोडले
– अर्जुन पुरस्कार मिळाल्यावर बॉक्सिंग सोडले आणि वेगळी राहू लागली. समजावण्यास गेल्यावर शिवीगाळ केली, धमकी देण्यात आली
भाजप प्रवेश, निवडणूकही लढली
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांही भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी 2023 मध्ये स्वीटी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सहभागी झाली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक हुड्डा याने भाजपच्या तिकीटावर मेहम मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र तो पराभूत झाला.