इंडिया आघाडीची विजयी घोडदौड कायम राखणार! उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात इंडिया आघाडीला दणदणीत यश मिळवून दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीतही ‘इंडिया’ आघाडीची विजयी घोडदौड कायम राखण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात आज झालेल्या बैठकीत करण्यात आला.

उद्धव ठाकरे यांनी आज राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर हे तीन नेते आज पहिल्यांदाच एकत्र आले होते. यावेळी त्यांच्यात देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. विशेषकरून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल विस्तृत चर्चा झाली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी विधानसभा निवडणुकीत एकदिलाने काम करून दणदणीत विजय मिळवला होता. विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांची वेळोवेळी बैठक व्हावी आणि विचारविनिमय करून रणनीती आखण्यात यावी, अशी सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी मांडली. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरेही याप्रसंगी उपस्थित होते.

आज सकाळपासूनच उद्धव ठाकरे व कुटुंबीयांना भेटण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रीघ लागली होती. समाजवादी पक्षाचे खासदार आदित्य यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, अपक्ष खासदार विशाल पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सर्वसंमतीने ठरवणार

महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार का, या मुद्दय़ाबाबतही उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आघाडीतील सर्व पक्ष मिळवून सर्वसंमतीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवतील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचे गठन एका व्यक्तीसाठी नाही, तर देशाला आणि महाराष्ट्राला लुटणारी युती आहे तिला सत्तेतून खाली खेचण्यासाठी झाले आहे. मुख्यमंत्री कधीही आम्ही बसून ठरवू शकतो. महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरे आहेत, पण महायुतीकडे जे चेहरे आहेत त्यातील एकही मुख्यमंत्रीपदासाठी लायक नाही. त्यांच्या कार्यकाळात जो कारभार सुरू आहे तशी स्थिती पुढे महाराष्ट्रात पुन्हा यावी असे जनतेच्या मनात नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडी एकसंध होऊन आगामी निवडणुकीला सामोरी जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.