मोदी सरकारविरोधात रविवारी ‘इंडिया’ची दिल्लीत महारॅली, केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध… 

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपाखाली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. केजरीवाल यांना प्रचारापासून रोखण्यासाठी त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्याआधी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक करण्यात आली. मोदी सरकारच्या या दडपशाहीविरोधात 31 मार्चला इंडिया आघाडीने दिल्लीतील रामलीला मैदानात सकाळी 10 वाजता महारॅली आयोजित केली आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांची भक्कम एकजूट दिसणार आहे. दिल्लीत आयोजित काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या मेगा रॅलीची घोषणा करण्यात आली.

लोकशाही आणि देश धोक्यात असून अटक केवळ केजरीवाल यांनाच झालेली नाही तर एक-एक करून देशभरातील विरोधी पक्षच संपवण्याचे षडयंत्र मोदी सरकारने रचल्याचा आरोप आपचे नेते आणि दिल्लीचे पॅबिनेट मंत्री गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. केजरीवाल यांच्या अटकेमुळे संविधान आणि लोकशाहीवर प्रेम करणाऱया प्रत्येक व्यक्तीच्या मनात मोदी सरकारच्या हुकूमशाही आणि दडपशाहीविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. आमदार खरेदी केले जात असून दुसरीकडे तपास यंत्रणांचा धाक दाखवून त्यांचा भाजपप्रवेश घडवून आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमदार विकले गेले नाहीत तर त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

केजरीवाल आता आणखी खतरनाक झालेत

अरविंद केजरीवाल यांना मोदी घाबरतात, असे मी ऐकले. त्यांना तुरुंगात डांबून आपण निश्चिंत झालो असे जर मोदी सरकारला वाटत असेल तर तसे नाही. कारण, आता अरविंद केजरीवाल आणखी खतरनाक झालेत. ते आतून जे काम करतील ते बाहेरून करणे कठीण होते. तुरुंगातून ते जे काही सांगतील ते लोक ऐकतील, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत मुंबईत वार्ताहारांशी बोलताना म्हणाले.

स्वातंत्र्यसंग्रामातही अनेक नेते तुरुंगात गेले. बाहेर आल्यानंतर ते आणखी मजबूत झाले आणि संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा राहिला याचीही त्यांनी आठवण करून दिली.

महारॅली लोकशाही वाचवण्यासाठी – अरविंदर सिंह लवली

31 मार्चची महारॅली राजकीय नसून देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आणि केंद्राविरोधात आवाज उठवण्यासाठी हाक असेल असे काँग्रेस नेते अरविंदर सिंह लवली म्हणाले. लोकशाहीमध्ये विरोधकांना निवडणूक लढण्याची समान संधी मिळायला हवी, पण काँग्रेसची खाती गोठवली गेली. ईडीच्या आडून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबले जात आहे, याविरोधात इंडिया आघाडी आवाज बुलंद करणार असल्याचे लवली यांनी सांगितले. दरम्यान, विरोधकांना निवडणूकच लढवू दिली जात नाही मग देशात लोकशाही वाचेलच कशी, असा सवाल आपच्या नेत्या आतिशी यांनी केला.

इंडिया आघाडीच्या महारॅलीबद्दल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही सर्व या महारॅलीत सहभागी होणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या महारॅलीचे निमंत्रण आले असून त्यासाठी दिल्लीत जाण्याबद्दल ते विचार करत असल्याचेही राऊत म्हणाले.