इंडिया आघाडी अधिक मजबूत; उद्धव ठाकरे यांची सोनिया गांधी, केजरीवाल कुटुंबियांची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तीन दिवसीय झंझावाती दिल्ली दौऱ्यामुळे इंडिया आघाडी अधिक मजबूत झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्यात आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी झाली. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांचीही उद्धव ठाकरे यांनी आज भेट घेऊन इंडिया आघाडी ही केवळ राजकीय आघाडी नसून एक कुटुंब आहे, असा संदेश दिला.

उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते. दिल्ली दौऱ्याचा अखेरचा दिवस भरगच्च गाठीभेटींचा होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ कायदेपंडित कपिल सिब्बल यांची उद्धव ठाकरे यांनी आज भेट घेतली.

भाजपच्या इशाऱ्यावरून सूडबुद्धीने तपास यंत्रणांनी दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. केजरीवाल इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असून उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल यांच्या कुटुंबियांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. घाबरू नका, संकटाच्या या काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा धीर उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल व कुटुंबीयांना दिला. केजरीवाल यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांचीही उद्धव ठाकरे यांनी आस्थेने चौकशी केली. लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडी, शिवसेना, आपची कामगिरी तसेच भविष्यातील राजकीय रणनीतीवरही या वेळी चर्चा झाली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे, शिवेसना नेते – खासदार संजय राऊत, आपचे खासदार संजय सिंह, राघव चड्ढा हे या वेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास 10 जनपथवर काँगेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत सोनिया गांधी यांच्यासोबत राजकीय विषयासोबतच कौटुंबिक गप्पाही रंगल्या. जवळपास 50 मिनिटे ही भेट झाली. या वेळी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि संजय राऊत हेसुद्धा उपस्थित होते. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ कायदेपंडित कपिल सिब्बल यांचीही भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

महाराष्ट्रात परिवर्तन घडेल – सोनिया गांधी

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दमदार कामगिरीवर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही चर्चा झाली. या वेळी सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या चमकदार कामगिरीबद्दल उद्धव ठाकरे यांची प्रशंसा केली व पुढील वाटचालीतही आघाडीला आणखी मोठा विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकदिलाने लढेल व राज्यात मोठे परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

उपराष्ट्रपतींकडून आदरातिथ्य

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ठाकरे कुटंबियांना न्याहरीसाठी संसद भवनाजवळ नव्यानेच उभारण्यात आलेल्या आपल्या  उपराष्ट्रपती निवासात आमंत्रित केले होते. या वेळी धनखड व त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आदरातिथ्य केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल व कुटुंबीयांची भेट घेतली.