विजयाच्या हॅट्ट्रिकसह मालिका खिशात! हिंदुस्थानचे चौथ्या टी-20मध्ये झिम्बाब्वेवर निर्विवाद वर्चस्व

सलामीच्या लढतीतील पराभवानंतर हिंदुस्थानने विजयाची हॅट्ट्रिक साजरी करत पाच सामन्यांची टी-20 क्रिकेट मालिका आधीच 3-1 फरकाने खिशात घातली. चौथ्या टी-20 लढतीत हिंदुस्थानने यजमानांवर निर्विवाद वर्चस्व गाजवित एकही फलंदाज न गमविता 28 चेंडू राखून दणदणीत मात केली. यशस्वी जैस्वाल व कर्णधार शुभमन गिल यांची अभेद्य भागीदारी या विजयाची वैशिष्टय़े ठरली.

झिम्बाब्वेकडून मिळालेले 153 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 15.2 षटकांत बिनबाद 156 धावा करीत सहज पूर्ण केले. यशस्वी जैस्वाल (नाबाद 93) व शुभमन गिल (नाबाद 58) यांनी 156 धावांची अभेद्य सलामी देत झिम्बाब्वेची गोलंदाजी निप्रभ ठरविली. जैस्वालने 53 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह आपली नाबाद खेळी सजविली, तर गिलने आपल्या अर्धशतकी खेळीत 39 चेंडूंत 6 चौकारांसह 2 षटकार ठोकले.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 7 बाद 152 धावसंख्येपर्यंत मजल मारली. तडीवानाशे मरूमणी (32) व वेस्ली मधेवरे (25) यांनी 8.4 षटकांत 63 धावांची सलामी दिली. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार सिपंदर रझा (46) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केल्याने झिम्बाब्वेला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. सिपंदरने 28 चेंडूंत 3 षटकारांसह 2 चेंडू सीमापार पाठविले, म्हणून झिम्बाब्वेला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. हिंदुस्थानकडून खलील अहमदने 2 फलंदाज बाद केले. तुषार देशपांडे, वाशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा व शिवम दुबे यांनीही प्रत्येकी एक बळी टिपला.

15 वर्षांपासून मालिकेत अजेय

टीम इंडियाने मागील 15 वर्षांपासून झिम्बाब्वेविरुद्ध सातत्याने  टी-20 क्रिकेट मालिका जिंकलेली आहे. उभय संघांमध्ये 2010मध्ये सर्वप्रथम टी-20 द्विपक्षीय मालिका झाली होती. त्यात हिंदुस्थानने 2-0ने बाजी मारली होती. 2015मध्ये मालिका बरोबरीत सुटली. मग 2016मध्ये हिंदुस्थानने 2-1 ने बाजी मारली. त्यानंतर थेट या वर्षी टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱयावर गेली आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका हिंदुस्थानने आधीच 3-1 फरकाने जिंकली आहे. उभय संघांमधील पाचवा व अखेरचा सामना रविवारी (दि.14) होणार आहे.