IND vs ZIM : आयपीएल स्टार्स झिम्बाब्वेपुढे ढेपाळले, विश्वविजेत्या हिंदुस्थानच्या दुय्यम संघाचा लाजिरवाणा पराभव

हिंदुस्थान आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना हरारेमध्ये खेळवण्यात आला. मात्र पहिल्याच सामन्यात विश्वविजेत्या हिंदुस्थानचा दुय्यम संघ ढेपाळला असून झिम्बाब्वेने टीम इंडियाचा 13 धावांनी लाजिरवाणा पराभव केला आहे.

हरारेमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली होती. नाणेफेक जिंकून शुभमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत झिम्बाब्वेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाच्या गोलदाजांनी चांगली गोलंदाजी करत झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले. झिम्बाब्वेकडून सलामीला आलेल्या मधेवरे (21 धावा), बेनेट (22 धावा), कर्णधार सिकंदर रझा (17 धावा), मायर्स (23 धावा) आणि मसाकदझा (29 धावा) यांनी केलेल्या धावसंख्येच्या जोरावर झिम्बाब्वेने टीम इंडियाला 116 धावांचे माफक आव्हान दिले होते. टीम इंडियाकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक चार विकेट घेतल्या, तर वॉशिग्टंन सुंदरने दोन विकेट घेतल्या. तसेच मुकेश कुमार आणि आवेश खान यांना एक-एक विकेट घेण्यात यश आले.

झिम्बाब्वेने दिलेल्या 116 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची चांगलीच तारांबळ उडाली. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत पहिल्या षटकापासूनच सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या अभिषेक शर्माला बेनेटने भोपळाही फोडू दिला नाही. कर्णधार शुभमन गिल (31 धावा), वॉशिंग्टन सुंदर (27 धावा) आणि आवेश खान (16 धावा) यांच्या व्यतिरिक्त एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. टीम इंडियाचा संपूर्ण संघ 109 या धावसंख्येवर बाद झाला. झिम्बाब्वेकडून तेंडाई चतारा आणि सिंकदर रझा यांनी 3-3 विकेट घेतल्या, तर बेनेट, मसादाझा, मुजरबानी आणि जोंगवे यांनी प्रत्येकी एक विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.