IND Vs ZIM : झिम्बाब्वेचा सुपडा साफ! टीम इंडियाचा 10 गडी राखत दणदणीत विजय, मालिकाही जिंकली

यशस्वी जयसवाल आणि कर्णधार शुभमन गिलने केलेल्या तुफान फलंदाजीमुळे टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा तब्बल दहा विकेटने पराभव केला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-1 अशा फरकाने आपल्या खिशात घातली.

झिम्बाब्वेने दिलेल्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली टीम इंडियाची सलामीची जोडी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर चांगलीच बरसली. कर्णधार शुभमन गिलने 39 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावांची खेळी केली, तर यशस्वी जयसवालने 53 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 93 धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियाने 16 व्या षटकामध्येच सामना आपल्या खिशात घालत पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-1 या फरकाने जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या सलामीविरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मधेवरे (25 धावा) आणि टी मारुमणी (32 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची मोठी भागीदारी केली. परंतु त्यानंतर आलेल्या फलंदाजांमध्ये कर्णधार सिकंदर रझा (46 धावा) वगळता इतर फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 152 धावांपर्यंत मजल मारू शकला. टीम इंडियाकडून खलील अहमदने दोन विकेट घेतल्या, तर तुषार देशपांडे, वॉशिग्टंन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.