IND Vs SA T20 World Cup Final 2024 : सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास काय होणार? वाचा सविस्तर

अवघ्या काही तासांनी टी20 वर्ल्ड कपमधील अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू होणार आहे. अपराजित राहिलेले दोन्ही संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा हायहोल्टेज सामना ब्रिजटाऊनच्या (बार्बाडोस) केंसिंग्टनमधील ओव्हलमध्ये खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट असून सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आणि एडन मार्करामच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने टी20 वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. आज (29 जून) संध्याकाळी 8 वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. परंतु 28 जून रोजी ब्रिजटाउनमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे आज होणाऱ्या अंतिम सामन्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान अंदाजानुसार, आज संध्याकाळी 7 वाजता ब्रिजटाऊनमध्ये 50 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रात्री 8 वाजता 55 टक्के, 9 वाजता 57 टक्के, 10 वाजता 72 टक्के, 11 वाजता 56 टक्के आणि मध्यरात्री 12 वाजता 51 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

पावसाच्या व्यत्ययामुळे जर निर्धारित वेळेमध्ये सामना होऊ शकला नाही, तर 190 मिनिटांचा अतिरिक्त वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच पावसामुळे 10-10 षटकांचा सुद्धा सामना होऊ शकला नाही, तर 30 जून रोजी सामना खेळवण्यात येणार आहे. राखिव दिवशीसुद्धा पावसामुळे सामन्यामध्ये व्यत्यय आला आणि कमीत कमी 10-10 षटकांचा सामना होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात येईल.