आम्हाला वेगवान गोलंदाजांची शक्ती उभारायचीय, रोहित शर्माला गोलंदाजांच्या दुखापतींची काळजी

हिंदुस्थानी संघाकडे फलंदाजांची एक जबरदस्त शक्ती आहे, तशीच शक्ती वेगवान गोलंदाजांचीही उभारायचीय. जेणेकरून गोलंदाजांना दुखापत झाली तरीही संघाच्या संतुलनावर त्याचा काडीचाही फरक पडणार नाही, अशी  भविष्यातली योजना कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी व्यक्त केली.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी अधिक वेळ लागतोय तर दुसरीकडे नवोदित गोलंदाज यश दयालही खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे रोहित शर्मा काहीसा चिंतीत दिसला. त्याबद्दल कसोटीच्या पूर्वसंध्येला तो म्हणाला, फलंदाजीत दुखापतींची समस्या आली तर आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. हेच चित्र आम्हाला आता गोलंदाजीतही उभे करायचे आहे. जर उद्या गोलंदाजीतही कोणतीही परिस्थिती उद्भवली  तर आमच्याकडे पर्यायी व्यवस्था असायला हवी, अशी शक्ती आम्हाला गोलंदाजीतही निर्माण करायचीय. भविष्यात आम्हाला अमुक एका खेळाडूवर अवलंबून राहायचे नाहीय. हे अत्यंत चुकीचे आहे. भविष्यात आम्हाला चांगले खेळाडू मिळावेत, म्हणून आम्ही आतापासूनच प्रयत्न करायला हवेत, असेही शर्मा म्हणाला.

वेगवान गोलंदाजांची नवी फळी तयार व्हावी म्हणून हिंदुस्थानने मयांक यादव, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि प्रसिध कृष्णा या वेगवान गोलंदाजांची न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी राखीव गोलंदाज म्हणून निवड केली आहे.

जैसवालच्या यशस्वी फलंदाजीचे आश्चर्य नाही

गेल्या वर्षी कसोटी पदार्पण करणाऱया यशस्वी जैसवालने आतापर्यंत 11 कसोटी सामन्यांत 64 धावांच्या सरासरीने 1217 धावा केल्या आहेत. तो सध्या हिंदुस्थानचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरतोय. पण कर्णधार रोहित शर्माला त्याच्या या सातत्यपूर्ण फलंदाजीबद्दल जराही आश्चर्य वाटत नाहीय. कारण यशस्वी हा एक प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याच्याजवळ कोणत्याही स्थितीत खेळण्याची कला असल्याचे रोहित अभिमानाने म्हणाला. यशस्वीने ज्या पद्धतीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केलीय, ते पाहून मी खूप आनंदी झालोय. तो प्रत्येक गोष्टीतून काही ना काही बोध घेत असतो. शिकत असतो. आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी धडपडत असतो. विशेष म्हणजे तो आपल्या कामगिरीपासून समाधानी नाहीय. प्रत्येक वेळी तो सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो.त्याच्या रूपाने आम्हाला एक चांगला खेळाडू लाभला आहे. तो आपले कामगिरीतील सातत्य पुढेही असेच कायम राखेल, अशी आशा असल्याचेही रोहित म्हणाला.