Ind Vs Nz 2nd Test – सँटनरच्या फिरकीला कर्णधार लॅथमची साथ, न्यूझीलंड भक्कम स्थितीत

टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने जबरदस्त कामगिरी करत सामन्यावर वर्चस्व निर्माण केले आहे. दिवसा अखेर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात पाच विकेट गमावत 198 धावा केल्या असून 301 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना चाहत्यांची निराशा केली. टीम इंडियाचा पहिला डाव फक्त 156 धावांवर आटोपला. यशस्वी जयस्वाल (30 धावा), शुभमन गिल (30 धावा) आणि रविंद्र जडेजा (38 धावा) यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. न्यूझीलंडचा फिरकीपटू सँटनरने आपलं फिरकीच जाळं पसरवत टीम इंडियाच्या 7 फलंदाजांना अचूक टिपले. त्याला फिलीप्स (2 विकेट) आणि अनुभवी साउदीची (1 विकेट) साथ मिळाली. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव 156 धावांवर संपुष्टात आला.

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने संघाचा चांगली सुरूवात करून दिली. त्याने 133 चेंडूंचा सामना करत 10 चौकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. मात्र, या व्यतिरिक्त इतर फलंदाज फार वेळ मैदानावर टिकू शकले नाही. कॉन्वे (17 धावा), व्हिल यंग (23 धावा), रचिन रवींद्र (9 धावा) आणि मिचेल (18 धावा) स्वस्तात माघारी परतले. सध्या टॉम ब्लंडेल (30 धावा) आणि ग्लेन फिलिप्स (9 धावा) फलंदाजी करत आहेत. वॉशिंग्टन सुंदरने आपला दबदबा कायम ठेवत न्यूझीलंडच्या 4 फलंदाजांना बाद केले अश्विनने 1 विकेट घेतली. दिवसा अखेर न्यूझीलंडने 5 विकेट गमावत 198 धावा केल्या आहेत.