सरफराजला उघडणार कसोटीचे दार

राहुल अनफिंटच, देवदत्त पडिक्कलही संघात, राजकोटमध्ये तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी

पहिल्या कसोटीत झालेल्या दुखापतीमुळे केएल राहुलला दुसऱया कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. तसेच परवा पुढील तीन कसोटीसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर करताना राहुलला संघात पुन्हा घेण्यात आले होते. मात्र आता तो अनफिट असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्याच्या जागी आयपीएल स्टार आणि कर्नाटकच्या देवदत्त पडिक्कलला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. विराट कोहली, राहुल आणि श्रेयस अय्यर संघाबाहेर गेल्यामुळे कसोटी पदार्पणाची वाट पाहत असलेल्या सरफराज खानसाठी राजकोटमध्ये संघाचे दार उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेले चार रणजी मोसम गाजवणारा मुंबईकर सरफराज गेले अनेक महिने केवळ चर्चेतच होता, पण आता तो प्रथमच संघापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया तिसऱया कसोटीसाठी अंतिम अकरा खेळाडूंत मुंबईकर सरफराज खान पदार्पण करणार, हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

केएल राहुलला हैदराबाद कसोटीत दुखापत झाली होती, त्यामुळे विशाखापट्टणम कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली होती. संघ व्यवस्थापनाला आशा होती की तो राजकोट कसोटीपूर्वी फिट होईल, पण तो अनफिट असल्यामुळे त्याला संघाबाहेरच ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी देवदत्त पडिक्कलची निवड करण्यात आली असली तरी राजकोटमध्ये सरफराजला कसोटीची पॅप मिळण्याची दाट शक्यता आहे. विशाखापट्टणम कसोटीतच सरफराजचे पदार्पण निश्चित मानले जात होते. मात्र आधीच संघात रोहित शर्मा, यशस्वी जैसवाल आणि श्रेयस अय्यर हे तीन मुंबईकर होते. त्यामुळे चौथा मुंबईकर संघात नको म्हणून सरफराजला डावलण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले होते. म्हणूनच संघात रजत पाटीदारची वर्णी लागली होती. मात्र रजत दोन्ही डावात अपयशी ठरल्यामुळे त्याला पुन्हा संघात संधी मिळणे कठीण आहे. त्यातच आता मुंबईकर अय्यर संघाबाहेर असल्यामुळे त्याच्या जागी मुंबईकर सरफराजची एण्ट्री अपेक्षित आहे. देवदत्त पडिक्कलसुद्धा फॉर्मात असल्यामुळे हिंदुस्थानची फलंदाजी मजबूत करण्यासाठी त्यालासुद्धा अजमवण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नव्हे तर श्रीकर भरतच्या हातून ग्लोव्हज काढले जाणार असून ध्रुव जुरेल त्याची जागा घेऊ शकतो, असेही भाकित वर्तवले जात आहे. त्यामुळे राजकोटला दोन किंवा तीन खेळाडूंनी पदार्पण केले तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.

राजकोट कसोटीसाठी हिंदुस्थानचा संभाव्य अंतिम संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जाडेजा/ वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज/ कुलदीप यादव.