हिंदुस्थानचा अग्निबाण

>>द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकताना जगाला निरोप पाठवला, वन डे असो वा कसोटी, आमच्या खेळपट्टय़ांवर आम्ही आमच्या वेगवान गोलंदाजाद्वारे हरवू शकतो. कधी तो गोलंदाज शमी असतो, कधी बुमरा. फक्त फिरकीवर जगण्याचे दिवस गेले.

माझ्या 73 वर्षांच्या आयुष्यात मी खूप काही पाहिलेय! पतौडी, पुंदरन, वाडेकरला केवळ चेंडूची लकाकी घालवण्यासाठी नवा चेंडू वापरताना पाहिलंय. दगडी खेळपट्टय़ांवर आपलं आयुष्य आणि कला पणाला लावताना रमाकांत देसाईला पाहिलंय.

कपिलदेवचा उदय पाहिलाय. कपिलच्या पावलावर पाऊल ठेवून श्रीनाथ, मग झहीरला येताना पाहिलंय. आणि आता वेगवान गोलंदाजांचा ताफा पाहतोय. हे एका आयुष्यात पाहणं शक्य आहे असं त्याकाळी वाटलं नव्हतं. माझा लाडका मित्र रमाकांत देसाई दुर्दैवी. देवा, का नाही त्याला थोडं उशिरा जन्माला घातलंस? परवा बुमराची गोलंदाजी पाहून डोळय़ाचं पारणं फिटलं. ओली पोपला टाकलेला यॉर्कर अग्निबाण होता. काही कळायच्या आत त्याचं घर उद्ध्वस्त झालं. त्या चेंडूचं पुनः पुन्हा स्वप्न पडलं नाही तर त्यालाच आश्चर्य वाटेल. पूर्वीच्या काळात भुताटकी ठरवली गेली असती.

तो म्हणतो ‘आयुष्यात मी यॉर्कर पहिल्यांदा शिकलो. तो मागच्या जन्माबद्दल बोलत असावा. असे यॉर्कर वकार, वसीम ही मंडळी मागच्या जन्मात शिकून येतात. नैसर्गिक स्विंगपेक्षा त्याचा रिव्हर्स स्विंग केवढा खतरनाक आहे. नाहीतर हिंदुस्थानी खेळपट्टय़ांवर तो कसा यशस्वी झाला असता? वेग, स्विंग, यॉर्कर, बाऊन्सर, अचूकता आणि हटके अॅक्शन ही शक्तिस्थानं बुमराला टी-20 तून थेट कसोटीला महान गोलंदाज करून गेली.

एकेकाळी मोठमोठय़ा वेगवान गोलंदाजांनी हिंदुस्थानी खेळपट्टय़ांवर खेळणं टाळले आहे. इंग्लंडचा टमन, जॉन स्नो, ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिली हिंदुस्थानात अधिकृत कसोटी सामना खेळले नाहीत. कोण दगडावर डोपं आपटणार ही भीती. फलंदाजाचं डोपं फुटण्यापेक्षा स्वतःचं डोपं फुटण्याची भीती अधिक होती; पण डेविडसन, हॉल, मॅकेन्झीसारखे वेगवान गोलंदाज हिंदुस्थानी पाटय़ावर यश मिळवून गेले. मग पाकिस्तानात सरफराज नवाजने रिव्हर्स स्विंगचा शोध लावला आणि मग दर्जेदार वेगवान गोलंदाज हिंदुस्थानात सामने जिंकून द्यायला लागले. अक्रम, वकार, रिचर्ड हॅडली, विंडीजचा तोफखाना आणि कपिल, श्रीनाथ, झहीर, शमी आणि बुमरा यांनी थंड हिंदुस्थानी खेळपट्टय़ा पेटवल्या.

दर्जेदार गोलंदाज कुठेही यश मिळवतो. जवळपास अख्खी हिंदुस्थानी फलंदाजी 41 वर्षांच्या जिमी अॅण्डरसनचा चेंडू शोधत असते. त्याने रोहित शर्माला टाकलेला चेंडू डोळय़ासमोर आहे? ती जादू होती. फक्त जादूगाराला कळली. भले खेळपट्टी फिरत असेल. फिरकी गोलंदाजांना ती आपली वाटत असेल, पण बुमराचे पहिल्या डावातले 6 बळी मॅच फिरवून गेले हे विसरू नका.