पाकिस्तानला त्यांच्या गुहेत जाऊन हरवण्याचा पराक्रम बांगलादेश क्रिकेट संघाने केलाय आणि त्यानंतर ताबडतोब ते हिंदुस्थानविरुद्ध खेळण्यासाठी हिंदुस्थानात येत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी संघाने सावध रहाण्याची गरज आहे. बांगलादेशचे मनोधैर्य उंचावलेले असल्यामुळे त्यांचे खेळाडू जोशात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 2-0ने पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केलीय. याआधी बांगलादेश कधीही पाकिस्तानविरुद्ध कसोटी जिंकला नव्हता आणि या वेळी त्यांनी चक्क पाकिस्तानचा 2-0ने पराभव करत नवा इतिहास रचला. त्यामुळे बांगलादेशच्या या पराक्रमी संघाला कुणीही कमी लेखण्याची चूक करणार नाही. गावसकरांनी आपल्या लेखात बांगलादेशचे चांगलेच काwतुक केलेय. आता त्यांच्याकडे जबरदस्त क्षमतेचे खेळाडू आहेत आणि काही युवा खेळाडूही प्रभावी खेळ करत आहेत. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध खेळणारा प्रत्येक संघ कोणताही धोका पत्करणार नाही. कारण जर हा संघ पाकिस्तानला धूळ चारू शकतो तर त्यांच्यासाठी अन्य संघांना हरवणेही फार कठीण नाही. त्यामुळे हिंदुस्थानविरुद्ध पुन्हा बांगलादेशी खेळाडू आपल्याला सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करतील. परिणामता आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने सर्वांचे लक्ष वेधलेय. आता सुरू होणारी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपदाचाच एक भाग आहे. सध्या हिंदुस्थान गुणतालिकेत अव्वल आहे, पण बांगलादेशही फार मागे नाही. ते मालिकाविजयामुळे चौथ्या क्रमांकावर आलेत. हिंदुस्थानी संघाला आपले अव्वल स्थान टिकवण्यासाठी बांगलादेशच नव्हे तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही दमदार कामगिरी करणे क्रमप्राप्त आहे. पुढील पाच महिन्यांत हिंदुस्थानी संघ 10 कसोटी खेळणार असल्यामुळे कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची नामी संधी असल्याचे गावसकरांनी आपल्या लेखात मांडलेय.
दुलीप ट्रॉफी आयोजनाचा फायदा
आगामी कसोटी मालिकेपूर्वी दुलीप ट्रॉफीचे आयोजन करून बीसीसीआयने चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंदुस्थान संघाला चांगले खेळाडू उपलब्ध होतील. पहिल्या दोन फेऱयांमधून चांगले फलंदाज निवडणे जरा कठीणच आहे. सोबत आपले महत्त्वाचे गोलंदाजही विश्रांती घेत असल्यामुळे आपला कोणता फलंदाज फॉर्मात आहे, हेसुद्धा शोधणे जरा आव्हानात्मकच आहे.