Ind Vs Ban 1st Test – तिसऱ्या दिवशी पंत आणि गिलचा धमाका, टीम इंडियाला जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि शुभमन गिलने धमाकेदार शतक झळकावले. त्यामुळे टीम इंडियाने बांगलादेशला 515 धावांचे आव्हान दिले आहे. आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशने चार विकेट गमावत 158 धावा केल्या आहेत.

चेन्नईच्या MA Chidambaram Stadium येथे टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यातील आज झालेल्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाकडून शुभमन गिल (119 धावा) आणि ऋषभ पंत (109 धावा) यांनी केलेल्या धमाकेदार फलंदाजीमुळे टीम इंडियाने 515 धावांची आघाडी घेत आपला दुसरा डाव 287 या धावसंख्येवर घोषित केला.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी करत चांगली सुरुवात केली. मात्र टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने झाकीर हसन (33 धावा) याला बाद करत बांगलादेशला पहिला हादरा दिला. त्यानंतर शादमान इस्लाम (35 धावा), मोमिनुल हक (13 धावा) आणि मुशफीकर रहिम (13 धावा) या तिघांना रविचंद्रन अश्विनने तंबुचा रस्ता दाखवला. मात्र नजमुल हुसेन शांतो याने अर्धशतकीय पारी खेळत संघाचा डाव सावरला आहे. तिसऱ्या दिवसा अखेर बांगलादेशने चार विकेट गमावत 158 धावा केल्या असून नाजमुल हुसेन शांतो (51 धावा) आणि शाकिब अल हसन (5 धावा) नाबाद आहेत. बांगलादेशला जिंकण्यासाठी 357 धावांची गरज आहे, तर टीम इंडियाला जिंकण्यासाठी सहा विकेटची गरज आहे.