Ind vs Aus: हिंदुस्थानच्या मालिका विजयाला चार चांद

ऑस्ट्रेलियाला 12 चेंडूंत 17 धावांचे माफक लक्ष्य गाठायचे असताना मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंहने केलेल्या अचूक माऱयामुळे हिंदुस्थानने 6 धावांनी थरारक विजयाची नोंद केली आणि जिंकलेल्या मालिकेला 4-1 ने चार चांद लावले. हिंदुस्थानला मालिकेत 3-1 विजयी आघाडी मिळवून देणारा अक्षर पटेल आजच्याही विजयाचा शिल्पकार ठरला. तसेच मालिकेत 9 विकेट घेणारा रवी बिष्णोई ‘मालिकावीर’ ठरला.

हिंदुस्थानच्या 161 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासाठी आव्हानात्मक ठरणार याची कल्पना होती. पण त्यांनी सुरू केलेला वेगवान खेळ पाहून ते हॅपी एंडिंगसाठी मैदानात उतरले आहेत असे वाटत होते. पण ट्रव्हिस हेडने 5 चौकार आणि एका षटकारासह 26 धावा ठोकल्या, पण बिष्णोईने त्याची यष्टी वाकवून सामन्याची चुरस वाढवली. मग बेन मॅक्डरमॉटने 5 षटकारांसह 54 धावा ठोकत सामना एकतर्फी केला होता. 30 चेंडूंत 45 धावांचे माफक आव्हान असताना तो बाद झाला. 22 चेंडूंत 32 धावांची गरज असताना मुकेश कुमारने सलग चेंडूंवर मॅथ्यू शॉर्ट आणि ड्वारशुईसला बाद करून सामना थरारक केला. तेव्हा कर्णधार मॅथ्यू वेडने काही सुरेख चौकार मारत संघाला विजयासमीप नेले होते, पण शेवटच्या क्षणी मुकेश कुमार आणि अर्शदीपने अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर नेले. शेवटच्या 6 चेंडूंत 10 धावा हव्या असताना अर्शदीपने वेडला अक्षरशः खेळवले आणि तिसऱया चेंडूवर झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला केवळ 3 धावाच काढता आल्या आणि हिंदुस्थानने 4-1 विजयासह मालिका खिशात घातली. फलंदाजीत 31 धावांची उपयुक्त खेळी करणाऱया अक्षर पटेलने 4 षटकांत केवळ 14 धावा दिल्या आणि एक विकेटही टिपला. या अष्टपैलू कामगिरीसाठी सलग दुसऱयांदा तो ‘सामनावीर’ ठरला. चौथ्या सामन्यातही तोच शिल्पकार होता.

त्याआधी यशस्वी जैसवाल (21), ऋतुराज गायकवाड (10), सूर्यकुमार यादव (5), रिंकू सिंग (6) या आघाडीवीरांच्या अपयशी कामगिरीमुळे हिंदुस्थानला पुन्हा एकदा 200 धावांच्या आत रोखण्यात ऑस्ट्रेलियाने यश मिळवले. श्रेयस अय्यरने 57 धावांचा तडाखेबंद खेळी आणि त्याने अक्षर पटेलसह सहाव्या विकेटसाठी केलेल्या 46 धावांच्या झुंजार भागीमुळे हिंदुस्थानला 160 धावांपर्यंत मजल मारता आली.

आजही नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि हिंदुस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आज यशस्वी जैसवालने झंझावाती खेळ सुरू केला खरा पण दोन षटकार आणि एक चौकार ठोकत केवळ 21 धावा केल्या असताना बेहरनडॉर्फने त्याला टिपले. पुढच्याच षटकात ऋतुराज गायकवाडही बाद झाला. मग सूर्यकुमार यादवनेही घोर निराशा केली आणि हिंदुस्थानची 3 बाद 46 अशी स्थिती झाली. गेल्या चारही सामन्यांत जोरदार खेळ करणारा रिंकू आला आणि वाटलं हिंदुस्थानच्या डावाला आकार मिळेल, पण तो आज लवकर बाद झाला आणि संघाची 4 बाद 55 अशी भीषण अवस्था झाली.

अय्यर नहीं फायर हूं मै…
हिंदुस्थानचे सर्व यशस्वी कलाकारा बाद झाल्यामुळे सारी जबाबदारी श्रेयस अय्यरवर पडली होती. त्यालाही या मालिकेत विशेष काही करता आले नव्हते. पण आज तो संकटमोचकाप्रमाणे संघाच्या मदतीला धावून आला. तो खेळपट्टीवर नुसता उभाच राहिला नाही तर त्याने संघाचा धावफलकही हलता ठेवला. आधी त्याने जितेश शर्मासह 42 धावांची भागी करत संघाला शतकासमीप नेले. पण ही भागी फुटल्यानंतर अय्यरने आपल्यातली धावांची आग दाखवताना अक्षर पटेलबरोबरही महत्त्वाची भागी केली. दोघांनी छान फटकेबाजी करत हिंदुस्थानला दीडशेसमीप नेले. अक्षरने 21 चेंडूंत 31 धावा काढल्या तर अय्यरनेही 5 चौकार आणि 2 षटकार खेचत 53 धावा काढल्या. तो विसाव्या षटकातच बाद झाला. त्यामुळे हिंदुस्थान 8 बाद 160 अशी मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाच्या बेहरनडॉर्फ आणि ड्वारशुइसने प्रत्येकी 2 विकेट घेतले.