शिवसेनेच्या वाघांनीच हिंदू राष्ट्रावरील कलंक दूर केला – संजय राऊत

अयोध्येतील आंदोलनात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तरुणांना प्रेरीत केले. शिवसेनेचे वाघ नसते तर हिंदू राष्ट्राचे श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार झाले नसते. शिवसैनिकांनीच हिंदू राष्ट्रावरील कलंक दूर केला, असे ठणकावून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे योगदान काय असे विचारणाऱ्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

नाशिकच्या हॉटेल डेमोक्रॉसी येथे शिवसेनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनानिमित्त ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे दोनदिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सोमवारी सकाळी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या प्रदर्शनाची संकल्पना शिवसेना नेते सुभाष देसाई यांची आहे, असे त्यांनी सांगितले. सुभाष देसाई हे अयोध्येतील लढय़ात पाठीला हत्यार बांधून सहभागी झाले होते. शिवसेना नेते मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी योगदान दिले, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

मंदिर उद्घाटनाला भाजपाला फक्त पक्ष आठवतो

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, लालकृष्ण आडवाणी, रामजन्मभूमी न्यासाचे नृत्यगोपालदास महाराज या प्रमुख नेत्यांनी आंदोलन पुढे नेले. सामान्य माणसातून शूर-वीर निर्माण करण्यासाठी सामर्थ्यशाली नेतृत्त्व लागते, ते त्यांनी केले. हौतात्म्य पत्करण्याची तयारी दाखवणाऱ्या तरुणांना प्रेरित केले. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने शिवसेनेच्या वाघांनी हे स्वप्न साकार केले. देशातील कारसेवक हे हिंदू म्हणून जमले होते. मात्र, आता मंदिर उद्घाटनाला भाजपाला फक्त पक्ष आठवतो आहे, अशी टीका त्यांनी केली.

फडणवीसांसाठी नागपुरातही प्रदर्शन भरवू!

हे प्रदर्शन आम्ही महाराष्ट्रात नेऊ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्मरणशक्तीला धक्का देण्यासाठी सुरुवात नागपूर येथून करू. ते खरे रामभक्त असतील आणि अयोध्येतील आंदोलनात सहभागी झाले असतील, तर प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांनीच करावं, असे खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचे योगदान काय असे विचारणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन खुले आहे, त्यांनी ते नीट पाहावे, असे आवाहनही केले.