राज्यराणी एक्प्रेसमध्ये दोन गटांत हाणामारी; निफाडमध्ये संतप्त प्रवाशांचा रेल रोको

राज्यराणी एक्प्रेसमध्ये गुरुवारी जागेच्या वादातून प्रवाशांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यात दोघे जण जखमी आहेत. या घटनेनंतर निफाड तालुक्यातील खेरवाडी स्थानकावर हल्लेखोरांनी साखळी खेचून पळ काढला. दरम्यान, संशयितांच्या अटकेची मागणी करीत संतप्त प्रवाशांनी काही वेळ रेल रोको केला.

नांदेड स्थानकावरून बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी तरुणांचे दोन गट राज्यराणी एक्प्रेसमध्ये चढले. एकाच डब्यात बसलेल्या या दोन गटांत जागेवरून पहाटेच्या सुमारास वाद सुरू झाला, ते परस्परांशी भिडले. दोनपैकी एका गटातील काही जणांनी चाकू हल्ला करून रक्कम हिसकावली. यात दोघे जण जखमी झाले आहेत. यामुळे इतर प्रवासी भयभीत झाले होते.सकाळी साडेसहाच्या सुमारास हल्लेखोरांनी साखळी खेचल्याने रेल्वे खेरवाडी स्थानकाजवळ थांबली. याचा फायदा घेत ते पसार झाले. संतप्त प्रवाशांनी खाली उतरून रेल रोको सुरू केला, संशयितांच्या अटकेची मागणी केली. या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रेल रोकोमुळे राज्यराणीपाठोपाठ येणारी सेवाग्राम एक्प्रेस काहीकाळ खोळंबली होती. इतरही गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. दरम्यान, दोघा जखमींना रेल्वे पोलिसांनी शासकीय वाहनातून नाशिकला आणले, त्यांच्यावर येथे उपचार करण्यात आले, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान अर्धा तासानंतर खेरवाडी येथून राज्यराणी मार्गस्थ झाली, अशी माहिती नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी दिली.