सब गोलमाल है…; निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना टोलमाफीचे गाजर, मुंबईच्या पाचही नाक्यांवर हलक्या वाहनांना मुक्त प्रवेश

सब गोलमाल है… निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारचा घोषणांचा पाऊस सुरूच असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील पाच प्रवेश नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज मध्यरात्री 12 वाजेपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

मुंबईच्या सीमेवर आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मुलुंड टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका असे पाच टोलनाके आहेत. या नाक्यांवरून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांना गेल्या 14 वर्षांपासून टोल आकारला जात होता. आता अवजड वाहने वगळता इतर वाहनांना टोल भरावा लागणार नाही.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या या पाच प्रवेश नाक्यांचे पंत्राट अवघे 2242.35 कोटी रुपये एकरकमी घेऊन एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 2010-11 मध्ये दिले होते. तत्पूर्वी एमएसआरडीसीकडून या नाक्यांवर टोलवसुली केली जात होती. एमएसआरडीसीने 1999-2000 ते 2009-2010 या कालावधीत एकूण 926.92 कोटी रुपये कर वसूल केला होता. मुंबईतील 31 उड्डाणपुलांच्या देखभाल दुरुस्तीकरिता झालेला खर्च वसूल करण्यासाठी मुंबईतील पाच प्रवेश नाक्यांवर टोल सुरू करण्यात आला. कंत्राटदार कंपनीकडून एमएसआरडीसीने घेतलेली रक्कम आणि गेल्या 14 वर्षांत टोल वसुलीतून कंपनीला मिळालेले पैसे यामध्ये मोठी तफावत असून कंपनीला या टोल वसुलीतून मोठा फायदाच झाल्याचे बोलले जात आहे.

n ज्या वाहनांचे वजन साडेसात हजार किलोपेक्षा जास्त नसते, त्या वाहनांचा समावेश हलक्या वाहनांमध्ये होतो. त्यात कार, जीप, ट्रक्टर यांचा समावेश होतो.

n हलक्या वाहनांबरोबरच शाळेच्या बसेस आणि एसटी गाडय़ांनाही टोलमधून सूट देण्यात आली आहे.